कोयनेतून विसर्ग कमी;..तर पाण्याची भांडी पालकमंत्री, आमदारांच्या दारी ठेवू - सतीश साखळकर
By अविनाश कोळी | Published: May 20, 2024 07:00 PM2024-05-20T19:00:49+5:302024-05-20T19:01:26+5:30
'निवडणूक पार पाडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला'
सांगली : निवडणूक पार पाडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला. निवडणुका होताच कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीतपाणीटंचाई निर्माण झाली तर नागरिकांना घेऊन पाण्याची भांडी आम्ही पालकमंत्री, आमदार यांच्या घरासमोर ठेवू, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिला.
सांगलीतून पाण्याची मागणी कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितल्यानंतर कोयना धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळताच नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त केला. मंचचे सतीश साखळकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुका पार पाडेपर्यंत सत्ताधारी नेत्यांनी पाण्याचा विसर्ग पुरेसा ठेवला. मतदान पार पडताच नेत्यांनी खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली.
सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी कमी झाल्याचे सांगितल्याने कोयनेतील विसर्ग घटविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत याचे परिणाम दिसून येतील. सांगली व कुपवाड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यापूर्वीही ज्यावेळी पाण्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा येथील लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. नागरिकांना त्रास होत असताना सर्व नेते गप्प होते. शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला तर पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर पाण्याची भांडी ठेवण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.