एसटीच्या अन्यायग्रस्त लिपिकांना मूळ ठिकाणी रुजू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:42 AM2020-12-12T04:42:08+5:302020-12-12T04:42:08+5:30
तासगाव : एसटी महामंडळाकडून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ९१ लिपिकांना अतिरिक्त ठरवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मूळ ...
तासगाव : एसटी महामंडळाकडून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ९१ लिपिकांना अतिरिक्त ठरवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मूळ ठिकाणी सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्यावतीने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
एसटी महामंडळाच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर विभागातील ९१ लिपिक टंकलेखकांना अतिरिक्त ठरवून अन्य विभागात बदली आणि सेवा खंडितची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे कर्मचारी संकटात सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांना तातडीने मूळ नियुक्तीच्या ठिकाणी सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी कामगार सेनेच्यावतीने व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे सातारा येथे करण्यात आली.
यावेळी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी बसस्थानकातील पोलीस चौक्या सक्षम कराव्यात, सहायक वाहतूक निरीक्षक या जागा सरळ सेवेऐवजी न भरता खात्याअंतर्गत भरण्यात याव्यात, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. एसटी कामगार सेनेचे सातारा विभागाचे सचिव सुहास जंगम, पवन फाळके, दीपा बुधावले, नथुराम शेंडगे यांच्यासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर विभागातील लिपिक, कर्मचारी उपस्थित होते.