कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातावर रिफ्लेक्टर बेल्टचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:34+5:302021-01-24T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मोकाट कुत्री आडवे येण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून व नसबंदी केलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोकाट कुत्री आडवे येण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून व नसबंदी केलेल्या श्वानाची ओळख होण्यासाठी रिफ्लेक्टर बेल्टचा पर्याय प्राणीमित्रांनी दिला आहे. काही कार्यकर्त्यांनी स्वत:हून ही मोहीम सुरू केली असली तरी त्यात शासनाच्या सहभागाची गरज आहे.
महापालिका क्षेत्रात सध्या ७ ते ८ हजार मोकाट कुत्री असून, जिल्ह्याची संख्या किती मोठी असेल, याचा अंदाज येतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री वावरत असल्याने रस्त्यावर त्यांच्या अचानक आडवे येण्यामुळे अपघात होत आहेत. यात अनेकांचा जीवही गेला आहे. किरकोळ अपघातांचे व त्यात जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.
या अपघातांवर उपाय म्हणून सांगलीत प्राणीमित्र असलेले महापालिकेचे मुकादम सिद्धार्थ कांबळे यांनी रिफ्लेक्टर बेल्टची संकल्पना पुढे आणली. श्वानांच्या गळ्यात जर हे बेल्ट घातले, तर दूरवरून वाहनांना कुत्रे आडवे येत असल्याचे समजून येईल. त्यामुळे हे अपघात टळतील. या संकल्पनेला आता अन्य संघटना व प्राणीमित्रांनी सहकार्य केले आहे. महापालिका क्षेत्रात कांबळे व प्राणीमित्र अजित काशिद यांनी स्वखर्चातून या मोहिमेला सुरुवात केली आहे. शासनाचा सहभाग यात काहीही नाही. एकीकडे श्वानांच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च केले जात असताना या नव्या संकल्पनेचा विचार का केला जात नाही, असा सवाल काशिद यांनी उपस्थित केला.
चौकट
पाचशे कुत्र्यांना बसविले बेल्ट
मुकादम कांबळे व अजित काशिद यांनी स्वखर्चातून ५०० श्वानांना असे बेल्ट बसविले आहेत. एका बेल्टमागे ४० ते ५० रुपये खर्च येतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांना हे बेल्ट बसविण्यासाठी प्रशासनाचा सहभाग आवश्यक आहे. डॉग ब्रिडिंग करणाऱ्या संस्थांकडून आता परवाना फी वसूल होणार आहे. त्या निधीतूनही हे काम सहज होऊ शकते.
चौकट
कान तोडण्यापेक्षा बेल्ट बरा
कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचे कान काही प्रमाणात कापले जातात. त्यापेक्षा रिफ्लेक्टर बेल्ट हा सोपा व शारीरिक इजा न करणारा उपाय आहे.