विट्यात पुन्हा साखळी भेटवस्तू योजना सुरू...

By admin | Published: January 18, 2015 11:35 PM2015-01-18T23:35:36+5:302015-01-19T00:29:53+5:30

फसवणुकीची शक्यता : कंपनीच्या नावात मात्र बदल

Reinvestment scheme to start brick ... | विट्यात पुन्हा साखळी भेटवस्तू योजना सुरू...

विट्यात पुन्हा साखळी भेटवस्तू योजना सुरू...

Next

दिलीप मोहिते - विटा -सांगली जिल्ह्याची सुवर्णनगरी म्हणून असलेल्या विटा शहरात पुन्हा एकदा साखळी भेटवस्तू योजनेने डोके वर काढले असून, आठवड्याला ठराविक रक्कम भरून घेऊन ग्राहकांच्या माथी कमी दर्जाच्या व गॅरंटी नसलेल्या वस्तू मारून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी ज्यांनी अशा काही योजनांतून शहरासह खानापूर तालुक्यात धुमाकूळ घातला, तेच यात सक्रिय आहेत.
तालुक्यात दहा वर्षांपूर्वी सुमन गारमेंट नावाच्या कंपनीने अवघ्या ६० रुपयांत दोन परकर देऊन ड्रॉ काढल्यानंतर विजेत्या ग्राहकांना चार ते पाचअंकी बक्षिसाचे आमिष दाखविले. फक्त एक ते दीड वर्षात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ, जत, मिरज यासह सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात सुमन गारमेंटने चांगलाच हंगामा केला. या मार्केटिंगसाठी संचालकांनी ग्रामीण भागातील एजंटांची नेमणूक करून त्यांनाही दुचाकी, चारचाकी गाड्यांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधींची माया जमा केली.
त्यानंतर मात्र या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. त्यातील संचालक स्थानिक खानापूर तालुक्यातीलच रहिवासी होते. परंतु, लोकांची रक्कम परत मिळाली नसल्याने कोट्यवधींचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी विटा शहरात अशाच एका भेटवस्तू साखळी योजनेचा जन्म झाला असून, सर्वसामान्यांना पूर्वी आर्थिक गंडा घातलेल्या काही संचालकांचा या कंपनीत समावेश करण्यात आला असल्याचे बोलले जाते.
या कंपनीत आठवड्याला पाचशे ते हजार रुपयांची गुंतवणूक करून आठ दिवसाला ड्रॉ काढण्यात येतो. त्यात विजेत्याला आकर्षक भेटवस्तूचे आमिष दाखविण्यात येते. परंतु, ही भेटवस्तू ग्राहकाने भरलेल्या रकमेपेक्षा कमी दराची व विनागॅरंटी असल्याने फसवणूक होत आहे. तरीही कंपनीचे संचालक व एजंट हे ग्रामीण भागातील लोकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

काय आहे योजना...
नव्याने सुरू झालेल्या अशाच एका साखळी भेटवस्तू योजनेत कंपनी ग्राहकांकडून आठवड्याला पाचशे ते सातशे रुपये भरून घेऊन ड्रॉ काढत आहे. सहभागी ग्राहकांपैकी अवघ्या एक ते दोन ग्राहकांना भेटवस्तू देऊन उर्वरित ग्राहकांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करण्यास भाग पाडत आहे. परंतु, पुढील आठवड्यापर्यंत ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ होऊन मागील ग्राहकांना पुन्हा पाचशे ते सातशे रुपये भरणे भाग पडत आहे. त्यामुळे योजनेद्वारे मिळणारी भेटवस्तू ही विनागॅरंटी व दर्जाहीन असल्याची चर्चा आहे.

विटा शहरात विनापरवाना साखळी भेटवस्तू योजना सुरू करून लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी व त्या कंपनीच्या संचालकांची गय केली जाणार नाही. एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास किंवा फसवणुकीची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यास तातडीने संचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अनिल पोवार, पोलीस निरीक्षक, विटा

Web Title: Reinvestment scheme to start brick ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.