सिव्हिलच्या दारात उघड्यावर झोपताहेत रुग्णांचे नातेवाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:26+5:302021-05-05T04:45:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासकीय रुग्णालयाचा मोठा आवार असूनही या ठिकाणी निवारा शेड नसल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासकीय रुग्णालयाचा मोठा आवार असूनही या ठिकाणी निवारा शेड नसल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालय आवारात उघड्यावर झोपावे लागत आहे. याप्रश्नी ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवारा शेड उभारण्याची किंवा संघटनेला तशी परवानगी देण्याची मागणी केली.
संघटनेचे शहर जिल्हा अध्यक्ष लालू मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार सुरू आहे. सांगलीतील अनेक खासगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये कोविड रुग्णांनी भरली आहेत. सांगलीचे शासकीय रुग्णालय हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यासह कोल्हापूर, कर्नाटकातील रुग्णांसाठी हे रुग्णालय आधार बनले आहे. अनेक खासगी रुग्णालयांनी नाकारल्यानंतर हे रुग्ण सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणले जात आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढत आहे.
रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांचे सिव्हिलमधील गैरसोयींमुळे हाल होत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग नको म्हणून नातेवाइकांना मज्जाव केला जात आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना निवारा शेड उपलब्ध नसल्याने त्यांना येथील सिव्हिलच्या आवारात उघड्यावर झोपावे लागत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या पावसाचेही वातावरण आहे. उघड्यावर झोपणे हे आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीने निवारा शेड उभे करण्यासाठी सूचना द्यावी किंवा संघटनेला शेड उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.