जिल्ह्यातील शिथिल केलेले निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:41+5:302021-06-18T04:19:41+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती आठवड्यापासून स्थिर असल्याने शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार आहेत. जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती आठवड्यापासून स्थिर असल्याने शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहणार आहेत. जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश असल्याने दुपारी चारपर्यंत सर्व दुकानांना परवानगी आहे. दरम्यान, या ‘वीकेंड’ला अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दोन दिवसांसाठी बंद राहतील.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांखाली आला. शिवाय ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढल्याने दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली होती. राज्य शासनाने प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार दर आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेट व उपलब्ध ऑक्सिजनची संख्या यांवरून स्तर ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. या आठवड्यातही जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट पाच ते १० टक्क्यांदरम्यान राहिल्याने पुढील आठवड्यातही चारपर्यंत बाजारपेठ खुली राहणार आहे, तर इतर निर्बंध कायम राहणार आहेत. प्रशासनाने याबाबत शासनाला अहवाल सादर केला आहे. आज, शुक्रवारी यावर निर्णय होणार आहे. दरम्यान, शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत.
कोट
या आठवड्यातही जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या स्थिर आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे. याबाबत शासन निर्देशांचे पालन करून निर्बंध कायम ठेवले जातील. पुढील आठवड्यातही तिसऱ्या स्तरातीलच नियमावली कायम राहील, अशी शक्यता आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी