चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; 'या' मार्गावरील वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:18 PM2022-08-08T18:18:00+5:302022-08-08T18:18:40+5:30
धरणात २९.०१ टीएमसी पाणीसाठा
गंगाराम पाटील
वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. अतिवृष्टी होत असल्याने पाणलोट क्षेत्रातुन हजार ९८५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आज, सोमवारी दुपारी धरणाचे वक्राकार दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यातून १६७५ क्युसेक विसर्ग व जलविद्युत केंद्राकडून १३७५ असा एकूण ३००० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत आला आहे. त्यामुळे वारणा नदीचेपाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली.
मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावानी सतर्कता बाळगावी असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर तर आज सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात ३५ मिलिमीटर असा एकूण ३२ तासात ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर एकूण १४८७ मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने येथे पूर्णपणे उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे चार ही दरवाजे उघडून १ हजार ३२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून १६७५ कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
आज दुपारी चार वाजता चांदोली धरणाची पाणी पातळी ६२१.४० मीटर इतकी आहे. धरणात २९.०१ टीएमसी पाणीसाठा असून धरण ८४.३३ टक्के भरले आहे. दरम्यान धरणाच्या दरवाजा केबीन मध्ये औपचारिक पुजा करून धरणातील पाण्याचे पुजन कार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा अधिकारी गोरख पाटील यांच्या हस्ते करून धरणाचे वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने खुले करण्यात आले.