प्रारूप मतदार याद्यांची ५ जूनला प्रसिद्धी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर : ३० जूनला याद्या अंतिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:21 PM2018-05-23T23:21:14+5:302018-05-23T23:21:14+5:30
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग निश्चिती,
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग निश्चिती, त्यावरील आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रभागाच्या मतदार याद्यांबाबतची सर्वच इच्छुक उमेदवारांची उत्कंठा अखेर संपुष्टात येणार आहे. प्रारूप मतदार याद्यांची ५ जून रोजी प्रसिद्धी केली जाणार असून त्यावरील हरकती व सुनावणी होऊन ३० जून रोजी मतदान केंद्रासह अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
सांगली महापालिकेची मुदत १३ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यासाठी जुलै महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार आहेत. गेल्याच महिन्यात प्रशासनाने नवीन प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती केले आहे. एकूण २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. मतदार याद्यांच्या कार्यक्रमांकडेही इच्छुकांचे लक्ष लागले होते. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला.
या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ हा अर्हता दिनांक धरून निवडणूक आयोगाने २१ मे २०१८ रोजी मतदार यादी अद्ययावत केलेली आहे. ही यादी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरली आहे. महापालिका प्रशासनाला १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध केलेली यादी प्रभागनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्धीची मुदत ५ जून आहे. पुढे नागरिकांकडून यासंदर्भात हरकती-सूचना दाखल करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार याद्या २७ जूनपर्यंत निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्धीसाठी ३० जूनची मुदत दिली आहे.