संख मध्यम प्रकल्पातून बोर नदीला पाणी सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:23 AM2021-03-24T04:23:51+5:302021-03-24T04:23:51+5:30
संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष ...
संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील पाणी कालवे व बोर नदीमध्ये सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाव्दारेे केली आहे.
निवेदनात म्हटले की, संख मध्यम प्रकल्प भरलेला असून, गेल्या दहा वर्षात एकदाही कालव्यात पाणी सोडलेले नाही. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने संख ते उमदीपर्यंत ३२ किलोमीटरचा कालवा पूर्ण केला आहे. १९९८ साली एकदाच पाणी सोडलेले आहे. त्यानंतर एकदाही शाखाधिकारी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडलेले नाही. कालव्यावर त्यांचे नियंत्रण नाही.
कालव्याला पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी या गावांना फायदा होणार आहे. बोर नदीला कोल्हापुरी बंधारे बांधलेले असून, नदीला पाणी सोडल्यास करजगी, बोगी, बेळाडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन कालवे तयार केलेले आहेत. शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधूनही करजगी, बोगी, बालगाव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही. संख तलावातून करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, उमदीपर्यंत कॅनॉलद्वारे व बोर नदीने पाणी सोडल्यास
करजगी, बोर्गी, बालगांव, बेळांडगी, सुसलाद, हळ्ळी बोर या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. संख मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अपर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.