पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू
By admin | Published: June 8, 2017 11:16 PM2017-06-08T23:16:51+5:302017-06-08T23:16:51+5:30
पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : चाफळ ते उंब्रज दरम्यानच्या ११ बंधाऱ्यांच्या फळ्या पाटबंधारे विभागाने काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाहून गेला आणि नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले.
यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उत्तरमांड नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळू लागली असून, पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका या सर्व शेतकऱ्यांना बसला असून, चाफळ येथील उत्तरमांड नदीवरील धरणातून तातडीने पाणी नदीपात्रात सोडावे, अन्यथा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला.
उत्तरमांड नदीवर चाफळ येथे धरण झाले, चाफळ ते उंब्रज दरम्यान जुने आणि नवीन अशा ११ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा केला जातो.
यामुळे या नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यातील गावांची सुमारे ६०० हेक्टर जमीन भिजते. या जमिनीना पाणीपुरवठा होतो म्हणून याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी ही पाटबंधारे विभागाकडून घेतली जात असते.
सद्य:स्थितीला अजूनही पाऊस पडला नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडबड करून २२ मे नंतर फळ्या काढल्या आणि बंधाऱ्यात असलेले पाणीही वाहून गेले. यामुळे उत्तरमांड नदीपात्र कोरडे पडले असून, ठणठणाट झाला आहे.
पिकांना आणि जनावरांना ही पाणी कसे पाजायचे, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.पाऊस पडला नाहीतर या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी कोठून पाजायचे याचे कसलेही नियोजन पाटबंधारे विभागाने केले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके जातील आणि याला करणीभूत पाटबंधारे विभागच राहील.
चाफळ येथील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील फळ्या काढून पाणी सोडून दिले ती चूक सुधारण्यासाठी त्यांनी आता चाफळ धरणातून उत्तरमांड नदीत पाणी सोडावे आणि ऐनभरात आलेल्या आमच्या पिकांना जीवदान द्यावे.याबाबत दखल घेऊन पाणी धरणातून सोडले नाही तर मात्र आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उंब्रज येथून जाणारा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहोत, असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
बंधाऱ्यावरील फळ्या ३१ मे पूर्वी काढाव्यात, असा शासनाचा नियम आहे. या नियमानुसार आम्ही बंधाऱ्यावरील फळ्या काढल्या आहेत; पण पाऊस पडला नाही, यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे आम्ही बुधवारी लघू पाटबंधारे विभाग सातारा यांच्याकडे पाणी सोडावे, अशी लेखीपत्राने मागणी केली आहे. पाणी धरणातून सोडण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्या विभागाकडून ही तातडीने पाणी सोडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
- शामराव नांगरे, शाखा अभियंता, तारळी व उत्तर मांड
उपसासिंचन विभाग तारळे