मतदारसंघ पुनर्रचनेत अपेक्षाभंगाची शक्यता

By admin | Published: June 29, 2016 11:37 PM2016-06-29T23:37:56+5:302016-06-30T00:03:42+5:30

जि. प. गट, पंचायत समिती गण ‘जैसे थे’च राहणार : निवडणूक आयोगाने लोकसंख्या मागविली

Reliable possibility of rehabilitation of constituencies | मतदारसंघ पुनर्रचनेत अपेक्षाभंगाची शक्यता

मतदारसंघ पुनर्रचनेत अपेक्षाभंगाची शक्यता

Next

सांगली : शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीत झाले आहे. मात्र तरीही मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्हा परिषद गट आणि गणांची संख्या कमी होणार नाही. हा लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. निवडणूक आयोगाने २०११ पासूनच्या जनगणनेची लोकसंख्या मागवून घेतली असून, दि. १ जुलैपासून मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया होणार आहे. दोन महिन्यात जिल्हा परिषद गट व गणांची रचना निश्चित होणार आहे.
पुनर्रचनेत खुल्या गटातील दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ बदलणार असल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे गट दोन आणि पंचायत समितीचे गण चार वाढणे अपेक्षित होते. परंतु, गट आणि गणांची पुनर्रचना करण्यापूर्वीच जत, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या मोठ्या ग्रामपंचायती नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणून शासनाने घोषित केल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ पुनर्रचनेतून या नवीन नगरपालिका व नगरपंचायतींची लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. ही लोकसंख्या वगळल्यानंतरही जिल्ह्यात २० लाख १५ हजार ८०० लोकसंख्या शिल्लक राहते. लोकसंख्या वाढल्यामुळे गट आणि गण कमी होणार नाहीत, असेच चित्र आहे. तथापि नेत्यांचा दबदबा आणि वर्चस्व असलेली मोठी गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून कमी होणार आहेत. याचा फटका अनेक नेत्यांना आणि त्यांच्या वारसांना बसणार, हे निश्चित आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्यामुळे स्पर्धकही मोठ्याप्रमाणात आहेत. अनेकांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मतदारसंघ पुनर्रचनेचा दिग्गजांना फटका बसणार आहे.
शिराळा ग्रामपंचायतीवर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत येथून त्यांचे समर्थकच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. शिराळा नगरपंचायत झाल्यामुळे जिल्हा परिषद गट व गणातून ती लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. साहजिकच मानसिंगराव नाईक गटाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरातील सम्राटसिंह नाईक अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. तालुक्यातील अन्य जि. प. गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचनाही बदलणार आहे. पलूस, कडेगावमध्येही तशीच परिस्थिती असून येथील बदलाचा काँग्रेसला फायदा होणार की राष्ट्रवादी-भाजपला हे आगामी निवडणुकांतच स्पष्ट होणार आहे.
कडेगावचे शांताराम कदम, संग्रामसिंह देशमुख यांनाही सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. पलूसमध्ये बापूसाहेब येसुगडे, सुहास पुदाले, अमरसिंह फडनाईक, विक्रम पाटील यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे येथील शिवसेनेचे हक्काचे मतदार कमी होणार आहेत. याचा राष्ट्रवादी, काँग्रेसला फायदा होणार, की शिवसेनाच चांगली बांधणी करून गड शाबूत ठेवणार, हे पुनर्रचनेत निश्चित होणार आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत झाल्याचा विजय सगरे गटाला फटका बसणार आहे. जि. प.चे माजी सभापती गजानन कोठावळे, गणपती सगरे अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाजूला गेले आहेत. येथील उर्वरित ग्रामीण भागावर आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. जत नगरपालिका झाल्यामुळे येथील काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा जिल्हा परिषद गट व गणाचे भवितव्यही अडचणीत येणार आहे. जत गट आणि या अंतर्गत येणारे गणच रद्द होणार आहेत. जत वगळून रामपूर आणि अमृतवाडी ही गावे अन्य मतदारसंघाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील नेते सुरेश शिंदे यांची पंचाईत झाली आहे.
जत, शिराळा, कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यातील जि. प. गट आणि पंचायत समिती गणांमध्ये मोठे बदल होणार आहेत. परंतु, वाळवा तालुक्यात मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे.


दीड लाखाने लोकसंख्या वाढीने चित्र बदलले
मागील वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी २००१ च्या लोकसंख्येचा विचार केला होता. त्यावेळी महापालिका व चार नगरपालिका वगळता जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ७९ हजार ९४९ होती. तिचा विचार करता, जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६३ होणे अपेक्षित होते. ती एकूण सदस्यसंख्येपेक्षा एकने जास्त असल्यामुळे वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक गट कमी करण्यात आला होता. २०११ च्या जनगणनेमध्ये महापालिका व नगरपालिका सोडून जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख २८ हजार ६२० झाली आहे. एक लाख ४८ हजार ६७१ लोकसंख्या वाढली आहे.

Web Title: Reliable possibility of rehabilitation of constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.