नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 03:01 PM2020-02-10T15:01:52+5:302020-02-10T15:02:37+5:30
इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ...
इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या सुबत्तेत वाढ होऊन तो आता समृद्ध झाला आहे. यापुढे विद्वत्तेची कास धरून त्यांचा गौरव करण्याची परंपरा जपली पाहिजे. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वांशी आपुलकी जपल्याने या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता आणि गौरव अंकाचे प्रकाशन जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांच्याहस्ते राजारामबापू नाट्यगृहात करण्यात आले.
यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी मॅरेथॉनपटू संग्रामसिंह पाटील, नेदरलँडमध्ये पर्यावरण शाखेचे शिक्षण घेणाऱ्या युगंधर विजयकुमार पाटील, उद्योजक हौसेराव भोसले, सुजित पाटील, रवींद्र पाटील यांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
जयंत पाटील म्हणाले, जुन्या पिढीने कष्टातून, संघर्षातून सहकाराची उभारणी केली. मात्र नव्या पिढीला सहकाराविषयी आपुलकी नाही. इथला सहकार बळकट असल्याने तालुक्यातील माणूस डगमगत नाही, ही सहकाराची ताकद आहे.
वाकुर्डे योजनेचे पाणी जूनपर्यंत शिराळा तालुक्यात तर आॅगस्टमध्ये वाळवा तालुक्यात येईल. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळे सर्वांचा सात-बारा कोरा होईल. नदीकाठच्या शेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय लवकरच होईल.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सामान्य, गरजूंना आर्थिक पाठबळ देत तालुक्यात आर्थिक परिवर्तन केले आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मागील युतीच्या शासनाने सहकारात मोठा गोंधळ घातला. त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. आमचे सरकार या सर्व कायदेबाह्य व्यवस्था बाजूला करणार आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात इंद्रप्रस्थ पतसंस्था २५ वर्षे कार्यरत राहिली, हे मोठे यश आहे. अनेक स्थित्यंतरे आली, तरी इंद्रप्रस्थ संस्थेने सामान्य माणसांचा विश्वास संपादन करत आपला ब्रँड निर्माण केला आहे.
अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विश्वास धस यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, प्रशांत थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विनायकराव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, नेताजी पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, प्रसाद तगारे, मोहनराव शिंदे, मेघा पाटील, छाया पाटील, कमल पाटील, अलका शहा, रोजा किणीकर, सुस्मिता जाधव, श्रद्धा चरापले, रंजना बारहते, शहाजी पाटील, बशीर मोमीन, राजारामबापू पाटील, अमोल पारेख उपस्थित होते.