शिराळ्याच्या नागपंचमीसाठी मध्य प्रदेशात धार्मिक विधी अखंड पारायण
By श्रीनिवास नागे | Published: July 15, 2023 05:23 PM2023-07-15T17:23:12+5:302023-07-15T17:24:08+5:30
पारंपरिक उत्सव पूर्ववत होण्यासाठी साकडे
शिराळा (जि. सांगली) : शिराळ्याचे वैभव असलेली पारंपरिक नागपंचमी पूर्ववत सुरू होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. ज्या गोरक्षनाथ महाराजांमुळे येथे जिवंत नागाची पूजा सुरू झाली, त्या मंदिराचे मठाधिपती पारसनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक नागपंचमी पूर्ववत सुरू व्हावी यासाठी मध्य प्रदेशात अखंड पारायण, पूजन आदी धार्मिक विधी सुरू केले आहेत.
मध्य प्रदेशातील बुधनी शहरात सुंदरकांडाचे अखंड पारायण नर्मदा नदीच्या तीरावर पारसनाथ यांच्या मठात सुरू केले आहे. पंचमुखी हनुमान मंदिरात संकल्प सोडला आहे. बुधनी येथे पारसनाथांचे शिष्य प्रयागनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनाथजी, संतोष हिरुगडे, ॲड. प्रदीप जोशी, सरपंच धनाजी मोरे, सदाशिव कुंभार महाराज, संतोष भोईटे यांनी अखंड पारायणाचा संकल्प सोडला आहे. खासदार संजय पाटील, आमदार विनय कोरे, मध्य प्रदेशातील खासदार शंकर ललवाणी, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल आदींचे सहकार्य लाभले आहे.
शिराळा आणि नागपंचमीचे अनेक वर्षांपासूनचे अतूट नाते आहे. ही परंपरा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांनी पाठपुरावा केला होता.
आता आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, नागमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक यांनी ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’ असा फलक मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर मुंबई-चेन्नई क्रिकेट सामन्यावेळी उंचावला होता. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी असाच फलक केदारनाथमध्ये फडकावला होता. ॲड. नाईक यांनी नागपंचमीच्या इतिहासावर पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रती तसेच निवेदने लोकप्रतिनिधींना दिले आहे. आता मध्य प्रदेशात नागपंचमीसाठी धार्मिक विधी सुरू असल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.