शिल्लक साखरेच्या साठवण, विक्रीची चिंता-सांगली जिल्ह्यात ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:33 PM2019-01-09T23:33:35+5:302019-01-09T23:39:06+5:30
साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख
अशोक डोंबाळे ।
सांगली : साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात एकत्रित ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक असल्यामुळे कारखान्यांची गोदामे भरली आहेत. अजून ४६ लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्यामुळे साखर विक्रीसह ती ठेवण्याचाही प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे.
केंद्र शासनाने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २९०० रुपये केल्यामुळे व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. म्हणूनच १४ कारखान्यांकडे मागील गळीत हंगामातील साखरेची विक्री झालेली नाही. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे २५ लाख क्विंटल साखर विक्री होत नसल्यामुळे शिल्लक आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या तीन युनिटकडेच जवळपास चार लाख क्विंटल जुनी साखर शिल्लक आहे.
२०१८-१९ च्या गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी संपला असून, या कालावधित ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जुनी आणि मागील दोन महिन्यात उत्पादन झालेली मिळून ७१ लाख क्विंटल साखर झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ४५ टक्केच उसाचे गाळप केले आहे.
कारखान्यांकडे नोंदणी असलेल्या ५५ टक्के म्हणजे ४६ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांची गोदामे साखरेने भरली आहेत. भविष्यात तयार होणारी साखर कुठे ठेवायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे. शिल्लक साखरेचा विचार करून राज्य शासनाने तातडीने साखर उद्योगासमोरील या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत २९०० रुपये क्विंटल केल्यामुळे महाराष्ट्रातील साखरेऐवजी व्यापारी उत्तर प्रदेशातील साखर खरेदीला प्राधान्य देत आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्यांना साखर जास्त लागते. या राज्यांना साखर पुरवठा करणारे व्यापारी वाहतूक खर्च कमी येत असल्यामुळे उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करून पाठवत आहेत.
महाराष्ट्रातून साखर खरेदी करुन अन्य राज्यांना पाठविण्यासाठी वाहतूक खर्च जादा येत असल्यामुळे व्यापाºयांचे दुर्लक्ष आहे. शासनाने साखर कारखान्यांना वाहतूक खर्चासाठी अनुदान दिले तरीही साखरेच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
अनुदान द्यावे : आर. डी. माहुली
देशातच सलग दोन वर्षे साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रति क्विंटल २९०० रुपये केली असल्याने व्यापाºयांना उत्तर प्रदेशातील साखर वाहतूक सोयीची होते. म्हणून बहुतांशी व्यापारी उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करुन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात पाठवत आहेत. महाराष्ट्रातील साखर खरेदीसाठी ते व्यापारी येत नाहीत. यावर शासनाने उपाय म्हणून प्रति क्विंटल साखरेला वाहतूक अनुदान द्यावे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. माहुली यांनी दिली.
जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती (गाळप मेट्रिक टन, साखर क्विंटल)
कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
वसंतदादा ३८८९८० ४५७७५० ११.७७
राजारामबापू (साखराळे) ४७४४०५ ५७१७०० १२.०५
विश्वासराव नाईक ३२४४०० ३८५००० ११.८७
हुतात्मा ३१४६४० ३६९२२५ ११.७३
महांकाली ११३७३० ११६८५० १०.३७
राजारामबापू (वाटेगाव) २८०७०० ३३३७०० ११.८९
सोनहिरा ४४१४१५ ५११६९० ११.५९
क्रांती ३८४७१० ४३६४७० ११.३५
कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
सर्वोदय १९१८५० २२६६७० ११.८१
मोहनराव शिंदे १९३८७० २१५००० ११.०९
निनाईदेवी (दालमिया) ११९२२५ १४०६०० ११़७९
केन अॅग्रो १६४९२० १७६६०० १०़७१
उदगिरी शुगर २५५४७० २९२८५० ११.४६
सद्गुरु श्री श्री शुगर २९९८४० ३३१०४४ ११़०४
एकूण ३९४८१५५ ४५६५१४९ ११़५६