नगरसेवकांना अंधारात ठेवून बिलांवर डल्ला : तासगाव नगरपरिषद सभेच्या टिपणीतून उल्लेख वगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:12 AM2018-09-01T00:12:14+5:302018-09-01T00:14:50+5:30
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पहिल्यांदाच तासगाव पालिकेत पावणेदोन वर्षांपूर्वी कमळ फुलले. केंद्रापासून पालिकेपर्यंत सत्तेत असल्याने शहरात अच्छे दिन येतील, भाजपचा एकछत्री अंमल असल्याने शहराचा
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पहिल्यांदाच तासगाव पालिकेत पावणेदोन वर्षांपूर्वी कमळ फुलले. केंद्रापासून पालिकेपर्यंत सत्तेत असल्याने शहरात अच्छे दिन येतील, भाजपचा एकछत्री अंमल असल्याने शहराचा कायापालट होईल, असे चित्र उभे राहिले. खासदारांनी स्वत:चे वजन वापरून कोट्यवधी रुपये आणले. मात्र पावणेदोन वर्षांत कोट्यवधी रुपये खर्ची पडले. त्यातून शहरापेक्षा कारभाऱ्यांचाच अधिक विकास झाला. शहर भकास राहिले. सत्ताधाºयांनी विकासाचा ढोल पिटून केलेल्या भ्रष्टाचारी कारभारामुळे अच्छे दिनचे स्वप्न तासगावकरांसाठी फोल ठरल्याचे चित्र आहे. पालिकेतील कारभाराच्या कारनाम्यांचा पंचनामा आजपासून...
दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव नगरपालिकेतील सत्ताधाºयांनी सुमारे ४५ लाख रुपयांच्या वाढीव कामांना मंजुरी देत, वाढीव बिले काढून घेतली. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या सभेत राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यावेळी नियमानुसार काम झाल्याचा खुलासा नगराध्यक्षांनी केला. मात्र वाढीव कामांची बिले काढण्यासाठी झालेल्या सभेच्या टिपणीत वाढीव कामांना मंजुरी देण्याबाबतचा किंंवा वाढीव बिले काढण्याबाबतचा विषयच विषयपत्रिकेत नसल्याची धक्कादायक माहिती चव्हाट्यावर आली आहे.
तासगाव शहरातील कापूर ओढा सुशोभिकरणासाठीचा मूळ आराखडा सुमारे ३० लाख रुपयांचा होता. त्यामध्ये दुप्पट वाढ करून सुमारे ७८ लाख रुपये खर्ची टाकण्यात आले. नारळाच्या बागेलगत मुरुमीकरण करून रस्ता करण्यात आला. या रस्त्यासाठी १५ लाख रुपये खर्ची टाकण्यात आले. भिलवडी रस्त्यालगत शिवाजीनगरला कॅनॉलशेजारून जाणाºया रस्त्यावर वाढीव आराखडा तयार करून सुमारे २० लाख रुपये खर्ची टाकण्यात आले. अशा एक ना अनेक कामांचे वाढीव आराखडे मंजूर करण्यात आले. त्यासाठीचा वाढीव खर्च देखील बेमालूमपणे काढण्यात आला.
सत्ताधारी भाजपमधील ठराविक कारभाºयांच्या गोल्डन गँगने अधिकारी आणि ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप राष्टÑवादीकडून होत आहे. सत्ताधाºयांनी झाकून केलेल्या कारभारामुळे या आरोपांवर शिक्कामोर्तब होत आहे. २० जून २०१७ रोजी झालेल्या सभेतच बहुतांश वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आले. या सभेच्या विषयांची टिपणी ६ जूनला सर्वच नगरसेवकांना देण्यात आली होती. वास्तविक या टिपणीत सभेत होणाºया सर्वच विषयांचा उल्लेख असणे आवश्यक होते. मात्र या टिपणीत वाढीव कामांचा कोणत्याच विषयाचा उल्लेख करण्यात आला नाही. या टिपणीवर दस्तुरखुद्द नगराध्यक्षांची सही असूनदेखील त्यांचेही लक्षात हा विषय आला नाही.
केवळ एका ओळीचा उल्लेख ठराव बेमालूपणे सभेत घुसडण्यात आला. वास्तविक एखाद्या कामावर लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना, त्या कामांची सविस्तर माहिती सभागृहाला मिळणे अपेक्षित होते. मात्र लाखो रुपयांवर डल्ला मारण्यासाठी ठराविक कारभाºयांनी प्रशासनातील काही अधिकाºयांना हाताला धरून पडद्याआडचा कारभार केला. याच कारभारातून लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला. वाढीव कामांचे मोजमाप आणि गुणवत्ता याबाबत सगळेच अंधारात आहे. निधी खर्ची पडलेल्या कामे एक तर राजरोजसपणे नियम धाब्यावर बसवून झालेली आहेत किंंवा केवळ कागदी घोडे नाचवून निधी खर्ची टाकण्यात आला आहे. जनतेला अंधारात ठेवून डल्ला मारण्याचा सत्ताधाºयांचा उद्योग, डोळे झाकून दूध पिणाºया मांजरीसारखा झाला आहे. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपच्या पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
पारदर्शी कारभाराचा ढिंढोरा
नगराध्यक्षांसहित सत्ताधारी भाजपच्या काही कारभाराºयांकडून नेहमीच पारदर्शी कारभाराचा ढोल पिटला जातो. विरोधकांकडून विनाकारण आरोप केले जात असल्याचे म्हटले जाते. लाखो रुपयांचा निधी खर्ची टाकताना कोणतीही चर्चा होत नाही. विरोधी नव्हे, तर सत्ताधारी नगरसेवकांनाही याची तिळमात्र कल्पना होत नाही. त्यामुळे पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया सत्ताधाºयांचा कारभाºयांचे पालिकेतील एक एक कारनामे बाहेर पडल्यानंतर ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.