योजनांमधून जनतेला दिलासा
By admin | Published: October 18, 2016 12:15 AM2016-10-18T00:15:56+5:302016-10-18T00:56:56+5:30
संजय पाटील : विटा येथे लाभार्थींना गॅस कनेक्शनचे वाटप
विटा : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी २७ योजना आणल्या. त्या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार क्रांतिकारक निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन खा. संजयकाका पाटील यांनी केले.
विटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात खा. पाटील बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते.
आ. अनिल बाबर म्हणाले, यापूर्वीही शासकीय योजनांचा लाभ मिळत होता. परंतु, त्याची टक्केवारी फारच कमी होती. मात्र आता शासकीय योजना थेट गरिबांच्या दारात पोहोविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाच्या व जनतेच्या हिताच्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. त्यांचे काम सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळेच गरिबांना आज खऱ्याअर्थाने न्याय मिळाला असल्याचे सांगितले.
नगरसेवक अनिल म. बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी खा. पाटील, आ. बाबर, नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याहस्ते लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सुहास पाटील, अॅड. विनोद गोसावी, दिग्विजय गॅसचे संजूकाका देशमुख, मोरया गॅसचे किशोर डोंबे, ऋषिकेश माने, विजय पाटील, सौ. शुभांगी कुलकर्णी, शंकर मोहिते, प्रताप सुतार यांच्यासह लाभार्थी महिला व नागरिक उपस्थित होते. अजित काळेबाग यांनी आभार मानले. (वार्ताहर)
धाडसी निर्णय...
खा. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातले. देशाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले गेले, आजही घेत आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन गृहिणींना मोठा आधार देण्याचे काम केले आहे. भाजप सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.
विटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून लाभार्थी महिलांना खा. संजय पाटील यांच्याहस्ते मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष वैभव पाटील, संजूकाका देशमुख, किशोर डोंबे, नगरसेवक अनिल म. बाबर उपस्थित होते.