सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; करणी काढण्याच्या आमिषाने २५ हजाराला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:33 AM2021-12-04T11:33:30+5:302021-12-04T11:33:53+5:30
मंत्र पुटपुटून करणी काढली असल्याचे सांगितले. संशयितावर जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : मुलीवर कुणीतरी करणी केली असून ती मंत्राने काढून देतो असे सांगत २५ हजार घेऊन एकाने फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अनुसया सुरेश वाईगडे (रा. हारूगडे प्लॉट, सांगलीवाडी) यांनी समीर अहमद सय्यद (रा. खणभाग, सांगली) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी फिर्यादी वाईंगडे यांच्या मुलीच्या पोटात दुखत होते. यावेळी संशयिताने मुलीवर ‘कोणीतरी करणी केली आहे’ असे सांगत मंत्राने ती काढून देतो म्हणून २५ हजार रुपये घेतले. यावेळी त्याने त्या मंत्र पुटपुटून करणी काढली असल्याचे सांगितले. यात फसवणूक झाल्याची तक्रार वाईंगडे यांनी दिली आहे. संशयिताने घेतलेले २५ हजार रुपयांची फिर्यादीच्या पतीने मागणी केल्यानंतर त्याने दंगा केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताचीही पोलिसात फिर्याद
संशयित सय्यद यानेही सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात अर्जुन दिलीप पाटील, सुरेश वाईंगडे व आप्पा कराचे (सर्व रा. सांगलीवाडी) यांनी मारहाण करत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.