दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर करा, सांगलीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे कृष्णेत जलबुडी आंदोलन
By संतोष भिसे | Published: March 10, 2023 05:10 PM2023-03-10T17:10:19+5:302023-03-10T17:11:17+5:30
सांगली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर कराव्यात या मागणीच्या पुर्ततेसाठी सांगलीत शुक्रवारी जलबुडी आंदोलन झाले. ...
सांगली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर कराव्यात या मागणीच्या पुर्ततेसाठी सांगलीत शुक्रवारी जलबुडी आंदोलन झाले. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीत आंदोलन केले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमीहीन शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. समाजकल्याण विभागामार्फत योजना राबवली जाते. या योजनेच लाभ घेण्यासाठी अनेक क्लिष्ट अटींचा सामना करावा लागतो. त्या दूर कराव्यात आणि योजनेचे सुलभीकरण करावे यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद सातत्याने पाठपुरावा करत आहे. जाचक अटींमुळे ही योजना मृगजळ ठरल्याचा परिषदेचा आक्षेप आहे.
योजनेतील जाचक अटी काढून मागासवर्गीयांना लाभ द्यावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी साठी शुक्रवारी आंदोलन झाले. या विषयावर विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी आदोलकांनी केली. कृष्णा नदीत कंबरेपर्यंत पाण्यात थांबून घोषणा दिल्या. पुरुष व महिला आंदोलन सहभागी झाले. आंदोलकांचे निवेदन देण्यासाठी समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी न आल्याने त्यांचा निषेधही करण्यात आला. आंदोलनात परिषदेचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण, प्रा. सुभाष वायदंडे आदींनी भाग घेतला.