प्रधानमंत्री विमा योजनेचे नुतनीकरण करा : अभिजित चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:20 PM2020-05-27T13:20:11+5:302020-05-27T13:27:29+5:30
प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बॅँका व पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ग्राहकांनी सुरक्षा विमा योजनेत तर २ लाख ३९ हजार ग्रहाकांनी जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविला आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. ज्यांच्या खात्यांवर पुरेशी रक्कम असणार नाही, ते योजनेतून बाहेर पडतील व त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.
सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये २ लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून १८ ते ७० या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता फक्त १२ रूपये आहे.
जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये २ लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. तरी सर्वांनी योजनांचे नुतनीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.