मुद्रांक परवान्यांचे नूतनीकरण अडले- सांगलीत नागरिकांच्या भर उन्हात रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:05 AM2018-04-11T01:05:28+5:302018-04-11T01:05:28+5:30
सांगली : जिल्ह्यातील ९० टक्के मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने सर्वत्र मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने मुद्रांक मिळविणे आता नागरिकांसाठी दिव्य कार्य होऊन बसले आहे.
सांगली शहरात एकूण ५० मुद्रांक विक्रेते आहेत. त्यापैकी केवळ ४ विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे. उर्वरित विक्रेत्यांचे अर्ज मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यापूर्वी दरवर्षी हा परवाना नूतनीकरण करून घ्यावा लागत होता. या वर्षापासून तीन वर्षांसाठी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विके्रत्यांसाठी एका बाजूला मुदतीचा दिलासा मिळाला असताना, दुसरीकडे व्यवसाय कराची अट अडचणीची ठरत आहे. नूतनीकरणाकरिता मुद्रांक विक्रेत्यांना व्यवसाय कर भरण्याची किंवा संबंधित विभागाच्या नाहरकत दाखल्याची अट लागू केली आहे. या अटीमुळेच बहुतांश परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे.
व्यवसाय कराची अट अन्य जिल्ह्यात कुठेही नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सांगलीत ही अट रद्द करावी म्हणून मुद्रांक विक्रेता संघटनेने मुद्रांक जिल्हाधिकाºयांशी चर्चाही केली होती, मात्र या चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. परिणामी नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. भर उन्हात मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांसमोर तासन् तास नागरिकांना रांगा लावून प्रतीक्षा करीत ताटकळत उभे राहावे लागत आहे. नागरिकांतून संतापही व्यक्त होत आहे. तरीही त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
...तर मनुष्यवधाचा गुन्हा : नितीन शिंदे
मनसेचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, अत्यंत तीव्र उन्हाच्या झळा सांगलीत असताना, मुद्रांकासाठी नागरिक रस्त्यावरच रांगा लावून थांबत आहेत. अशात कोणाचाही उन्हाने किंवा रांगेत उभे राहून बळी जाऊ शकतो. अशी घटना जर घडली, तर ज्यांनी हा गोंधळ घातला आहे, अशा संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाºयांवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू. तातडीने मुद्रांकाची व्यवस्था सुरळीत करावी, कुठेही नागरिकांच्या रांगा लागता कामा नये, अशी आमची प्रमुख मागणी आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनही छेडले जाईल.
जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण रखडल्याने सांगलीत मुद्रांक खरेदीसाठी भर उन्हात नागरिकांना रांगा लावून ताटकळत थांबावे लागत आहे.