सांगलीतील प्रथितयश उद्योजक, प्रयोगशील शेतकरी रंगराव इरळे यांचे निधन
By संतोष भिसे | Published: June 30, 2023 06:20 PM2023-06-30T18:20:23+5:302023-06-30T18:22:14+5:30
ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
सांगली : प्रथितयश उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी रंगराव कृष्णा इरळे (वय ७३) यांचे शुक्रवारी (दि. ३०) ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सकाळी अकराच्या सुमारास ह्रद्यविकाराचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. सावर्डे (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दाजी या नावाने ते बहुपरिचित होते. अखिल भारतीय माळी समाज, शिवप्रसाद पतसंस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सांगलीतील माळी मंगल कार्यालय, शिवप्रसाद विकास परिषद आदी संस्थांचे आधारस्तंभ होते. सावर्डे येथे त्यांची मोठ्या प्रमाणात द्राक्षबागायत आहे. तरुण वयात काही काळ पुण्यात खासगी कंपनीत नोकरीनंतर ते सांगलीला परतले. द्राक्षांच्या पॅकिंगसाठी बॉक्सचे उत्पादन सुरु केले.
पहिल्या टप्प्यात सांगलीत औद्योगिक वसाहतीत सुयोग पॅकवेल उद्योग सुरु केला. त्यानंतर मिरज औद्योगिक वसाहतीतही कारखाना सुरु केला. हा दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पॅकेजिंग उद्योग समूह ठरला आहे. विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या अचानक निधनाने सांगली, मिरजेतील उद्योगजगताला धक्का बसला. सायंकाळी अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने उद्योजक सावर्डे येथे हजर होते.