महामार्गबाधित मोठ्या झाडांचे पुनर्राेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:16 AM2019-08-26T00:16:31+5:302019-08-26T00:17:46+5:30
मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत.
मिरज : मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित केलेल्या कळंबीजवळ शेतजमिनीत असलेली सुमारे ७० आंबा व नारळाची झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून त्यांचे पुनर्रोपण केले आहे. महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, पदरमोड करीत मोठा खर्च करून शेतातील झाडे वाचविण्याची विजय गुजर यांची ही धडपड पर्यावरणासाठी आदर्शवत ठरली आहे.
मिरज तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या संपादित जमिनीत असलेल्या झाडांची शेतकऱ्यांना भरपाई देऊन अनेक गावांतील शेतांमध्ये व रस्त्याकडेला असणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे.
मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी कळंबी गावच्या हद्दीत असलेल्या शेतात १५ वर्षांपूर्वी मोठे शिल्पसंग्रहालय व विविध प्रकारची फळझाडे लावली होती. गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. शेतात अनेक लहान-मोठ्या शिल्पकृतीही ठेवल्या आहेत. शेतात ३० फूट उंचीचे मारुतीचे भव्य शिल्प मिरज-पंढरपूर मार्गावर नजरेस पडते. मात्र महामार्गासाठी संपादित होणाºया दीड एकर शेतजमिनीत पंधरा वर्षे जोपासलेली ४० आंब्याची, ३० नारळाची झाडे व अन्य फळझाडेही नष्ट होणार असल्याने, विजय गुजर यांनी या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निश्चय केला.
गेला महिनाभर या झाडांच्या पुनर्राेपणाचे काम सुरू असून यासाठी जेसीबी, पोकलॅन व क्रेनचा वापर करण्यात येत आहे. जेसीबीने झाडांभोवती खड्डा काढून मुळांसह झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून तेथून काही अंतरावर असलेल्या शेतजमिनीत मोठा खड्डा काढून तेथे या झाडांचे रोपण करण्यात येत आहे.
पर्यावरणप्रेमींना दिलासा
पुनर्राेपण केलेली झाडे पुन्हा पूर्वीप्रमाणे जगतील, बहरतील व पर्यावरणाची हानी टाळता येईल, असा विश्वास गुजर यांनी व्यक्त केला. मिरज-पंढरपूर रस्त्यावर महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, झाडांचे पुनर्राेपण करण्याचे विजय गुजर यांचे प्रयत्न पर्यावरणप्रेमींना दिलासा देणारे आहेत.