पलूस तालुक्यात पुन्हा दुरंगी सामना--ग्रामपंचायत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:30 AM2017-09-17T00:30:39+5:302017-09-17T00:30:52+5:30
किरण सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून, आचारसंहिता लागू झाली तरीही काँग्रेसमध्ये सामसूम आहे, तर भाजप व राष्ट्रवादीकडून बैठकांवर जोर असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकानंतर काँग्रेसची भूमिका सावध असली तरी, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा परंपरागत विरोधक कदम-देशमुख गटात दुरंगी सामना रंगणार आहे.
पलूस तालुक्यातील कुंडल, बांबवडे, घोगाव, सांडगेवाडी, सावंतपूर, दुधोंडी, पुणदी तर्फ वाळवा, पुणदीवाडी, बुर्ली, अंकलखोप, हजारवाडी, वसगडे, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, येथील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यातील अनेक गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी आधीपासूनच फिल्डिंग लावली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीच्या यशाने कार्यकर्ते जोशात आहेत.
अनेक गावांमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे असून, काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर आघाड्या होतील का? तसेच गेल्या निवडणुकीत मिळालेले यश पाहता, काँग्रेसला रोखण्यासाठी पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, महेंद्र लाड, अरूण लाड यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुकांचा फड रंगणार आहे. २०१९ च्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
१४ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, थेट सरपंच निवडीमुळेही निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार असून सरपंच पदाच्या जागेसाठी अनेकांनी आताच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा तयारीत आहे. थेट सरपंच पदासाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत दक्षता घेण्यात आलेली दिसते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर पलूस तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे पतंगराव कदम व कुटुंबीय कोणती दिशा घेऊन काम करतात, याकडे लक्ष लागले आहे. भाजपचे नेते, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकांमध्ये दोन्ही नेते एकत्र येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याने चिंता
पलूस तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून डॉ. पतंगराव कदम यांना मोठा धक्का दिला. डॉ. कदम हे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून लक्ष ठेवून आहेत. गावा-गावात असणारे काँग्रेसचे गट एकत्र आले, तरच भाजप व राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान निर्माण करणे काँग्रेसला शक्य होणार आहे. सध्या काँग्रेसच्या गोटात सामसूम असून, भाजप व राष्ट्रवादीने चांगलेच रान उठविल्याचे चित्र आहे.