टाकळीत महामार्गाच्या आड येणाऱ्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:24+5:302021-07-31T04:27:24+5:30
मिरज : टाकळी (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात अडथळा ठरलेल्या १५ वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांचे ग्रामस्थ व ठेकेदार ...
मिरज : टाकळी (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात अडथळा ठरलेल्या १५ वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांचे ग्रामस्थ व ठेकेदार कंपनीमार्फत अन्यत्र पुनर्रोपण करण्यात आले. याबाबत पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम टाकळीत गतीने सुरू आहे. पंधरा वर्षांपूर्वी टाकळीतील काही तरुणांनी रस्त्याच्या कडेला वडाच्या झाडाचे रोपण केले होते. या वडाचा वटवृक्ष झाला आहे. वटपौर्णिमेस गावात या झाडाचे पूजन करण्यात येत होते. विसावा घेण्यासाठी झाडाची सावली उपयोगी पडत होती. वडाच्या झाडाखाली ग्रामस्थांच्या गप्पागोष्टी रंगत होत्या. अनेकांच्या आठवणी जडलेले हे वडाचे झाड महामार्गाच्या कामासाठी काढण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी पुनर्रोपणाची तयारी केली. ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत तोडरमल, लिंबाजी पवार, अभियंता सुनील पाटील, संतोष लाड, राजेंद्र कुमार, बाळासाहेब कोळी, पोलीस पाटील संजय माने, ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे, संजय पाटील, शिवाजी वाघमोडे, सचिन गुळवणे यांच्या सहकार्याने वडाचे झाड जेसीबीच्या साह्याने मुळासह काढण्यात आले. तीस फूट उंचीच्या या झाडाचे मूळ जागेपासून दीड किलाेमीटर अंतरावर टाकळीतील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. वडाच्या झाडाच्या पुनर्रोपणामुळे वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.