सांगलीतील शेख बंधूंनी कुलूप-चावीवर साकारल्या महापुरुषांच्या हुबेहूब प्रतिकृती
By हणमंत पाटील | Published: October 14, 2023 04:34 PM2023-10-14T16:34:27+5:302023-10-14T16:34:56+5:30
सुरेंद्र दुपटे संजयनगर : सांगलीतील कुलूप-चावी दुरुस्ती आणि विक्री करणाऱ्या शेख बंधूंची कारागिरी सर्वत्र चर्चेत आली आहे. महापुरुषांवरील प्रेम ...
सुरेंद्र दुपटे
संजयनगर : सांगलीतील कुलूप-चावी दुरुस्ती आणि विक्री करणाऱ्या शेख बंधूंची कारागिरी सर्वत्र चर्चेत आली आहे. महापुरुषांवरील प्रेम व श्रद्धेतून त्यांनी कुलपावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. तसेच चावीवर ओम, ७८६ आदी चिन्हे कोरून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेख बंधूंनी गणेशाची मूर्ती असणारे बनवलेले पितळी कुलूप सध्या गणरायाच्या सांगलीनगरीत चर्चेत आहे.
सांगलीतील शहर पोलिस ठाण्याजवळच शेख बंधूंचे कुलूप-चावीचे दुकान आहे. दुकानात अकबर, वाहिद आणि अहमद हे शेख बंधू किल्ली बनवण्याचा व्यवसाय करतात. शेख बंधूंची ही तिसरी पिढी या व्यवसायात आहे. शेख बंधूंनी यापूर्वीही गणेशोत्सवात कुलपाच्या किल्लीमध्ये गणपती साकारला होता. गणेश भक्तांनी या कलाकृतीला दाद दिली होती. संपूर्ण पितळी असणारे हे कुलूप अनेकांनी खरेदी केले. अशा प्रकारची कुलपे जुन्या काळातील राजवाडा किंवा हवेलीसाठी तसेच तिजोरीसाठी वापरली जात होती. अशा प्रकारचे पितळी कुलूप शेख बंधूंनी बनवले आहे.
नवीन कलाकृतीसाठी प्रयत्नशील...
शेख बंधू हे ठराविक दिवसांनंतर कुलूप-चावीमध्ये वेगळी कलाकृती घेऊन ग्राहकांसमोर जातात. गणपतीच्या रूपातील किल्लीसह शेख बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हनुमान, प्रभू येशू, ७८६, क्रॉस, ओम, ताजमहाल, हार्ट, बंदूक, तलवार अशा कलाकृती साकारल्या आहेत. तसेच नवीन कलाकृतीसाठी सदैव ते प्रयत्नशील दिसतात.