भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीचा अहवाल प्रदेशकडे पलूस-कडेगाव पोटनिवडणूक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:14 AM2018-04-29T00:14:18+5:302018-04-29T00:14:18+5:30
सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. याच मतदारसंघात (पूर्वीचा भिलवडी-वांगी) १९९६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला पृथ्वीराज देशमुख यांचे समर्थक देत आहेत. त्यावेळीही संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक पतंगराव कदम यांनी व त्यांच्या समर्थकांनी लढविली होती. त्यामुळे पतंगराव कदम यांच्या पश्चात पृथ्वीराज देशमुख यांनीही तशीच भूमिका घ्यावी, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. मतदारसंघातील आताची माहिती प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतानाच अंतिम निर्णय भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेतेमंडळी घेणार आहेत.
मे महिन्यातील पहिल्याच आठवड्यात याबाबत भाजपचा निर्णय स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे व अन्य मोजक्याच पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत होणार आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतही प्रदेशकडे मांडण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावर पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीबाबत कोणता निर्णय होणार, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसच्यावतीने पतंगराव कदम यांचे पुत्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे, मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत निर्णय घेतलेला नाही.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर लागलेली तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले नव्हते. भाजपचा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत तातडीने निर्णय झाला होता, मात्र पलूस-कडेगावमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळीच आहे. या निवडणुकीला जुना इतिहास चिकटल्याने पोटनिवडणूक लढविण्याबाबतचा विचार देशमुख गट करीत आहे.
आठवडाभरात बैठक
भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, भाजपच्या प्रदेश स्तरावरच पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीचा निर्णय होईल. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची बैठक होण्याची शक्यता आहे.