आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी
By admin | Published: April 15, 2017 12:03 AM2017-04-15T00:03:03+5:302017-04-15T00:03:03+5:30
अर्थमंत्र्यांनी हात वर केलेत, वीज जोडणार कशी?; खासदार, आमदारांचा अधिकाऱ्यांना सवाल
सांगली : सांगली जिल्हा वीज बिल वसुलीत आघाडीवर असतानाही अर्थमंत्र्यांनी १६ हजार शेतीपंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वीज जोडणी कशी करणार, असा सवाल करत खासदार, आमदारांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. बोगस बियाणे, खते तपासणीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही खासदार, आमदारांनी केला.
खरीप हंगामाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार मोहनराव कदम, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त रवींद्र खेबूडकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणुमंत गुणाले, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कृषी विभागाचा आढावा साबळे आणि कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिला. भोसले यांनी, गेल्या वर्षभरात एकही बोगस बियाणे आणि खताचे प्रकरण आढळून आले नसल्याचे सांगितले. त्यावर आ. नाईक व बाबर म्हणाले की, पथके नक्की जिल्ह्यात तपासणी करतात का? भाताचे नमुने शेतकऱ्यांना बोगस आढळून आल्याच्या शिराळ्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आटपाडीत कापूस कंपन्यांकडून बोगस बियाणांचा पुरवठा झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई दिली जात नाही. तरीही बोगस बियाणे, खते नसल्याची चुकीची माहिती का देता?
त्यावर खा. पाटील यांनीही गुळमुळीत उत्तरे देताच कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असा दम आ. नाईक व बाबर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भरला. बोगस बियाणे, खतावरून आमदार, खासदार आक्रमक झाल्यामुळे पालकमंत्री देशमुख यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन, कागदोपत्री तपासण्या करू नका, असा इशारा दिला. यापुढे असा बोगस कारभार चालणार नाही, प्रत्यक्ष कारवाई करून अहवाल देण्याची अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिली.
महावितरणकडून १६ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्याचा मुद्दा आ. बाबर, नाईक यांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात महावितरणचे अधिकारी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मुनगंटीवार यांनी, वीज जोडणीसाठी निधी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना वीज जोडणी कशी देणार आहेत, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. उलट तुमच्याकडील ३५८ कोटींची थकबाकी वसूल करून तो निधी तेथे वापरण्याची सूचना दिली. आम्ही वसूल केलेला निधी तर जिल्ह्यासाठी मिळणार याची खात्री ते देणार आहेत का, असा प्रश्न संजयकाका पाटील, बाबर यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील खासदार, आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांची समस्या सांगू. ते निश्चित निधी देतील. जर त्यांनी निधी दिलाच नाही, तर थकबाकी वसुली करून तो निधी आम्हाला खर्च करण्याची परवानगी लेखी घेऊन वसुलीसाठी प्रयत्न करूया. काहीही करू, पण शेतकऱ्यांना येत्या वर्षभरात वीज जोडणी देण्याचा प्रयत्न राहील.