रिपब्लिकन स्टुडंट युनियनची शासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:15 PM2021-07-05T13:15:40+5:302021-07-05T13:19:27+5:30
Crime News Education Sector sangli : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून अशा आत्महत्या रोखायच्या असतील तर, शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून अशा आत्महत्या रोखायच्या असतील तर, शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. या देशात दर तासाला १ विद्यार्थी तर प्रत्येक दिवसाला २८ विद्यार्थी आत्महत्या करतात. प्रत्येक ७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागील एक विद्यार्थी हा महाराष्ट्रातील असतो. दरदिवशी या राज्यात ४ विद्यार्थी आत्महत्या करतात.
लोणकरची आत्महत्या ही निर्दयी, संवेदनाहीन व्यवस्थेने घडवलेली असून हा मनुष्यवध आहे. यापूर्वी पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी यांनी जातीय व्यवस्थेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. स्पर्धा परीक्षांच्या युगात विविध क्लासेसची लागलेली चढाओढ, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वाढती बेरोजगारी, खासगीकरण, कमी होणाऱ्या नोकऱ्या, स्पर्धा परीक्षा व नोकरीतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचे कर्ज, शैक्षणिक कर्ज, गरीब परिस्थिती, वाढती वयोमर्यादा व मर्यादित परीक्षेसाठी अटेम्प्ट, रखडलेल्या विविध सरकारी तसेच स्पर्धा परीक्षांचे निकाल यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक, शाररीक, आर्थिक दडपण येत आहे. शोषण होत आहे.
प्रसंगी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील आमदारदेखील राजकीय पक्षाचे बाहुले झाले आहेत. महाआघाडी सरकारने तत्काळ सर्व विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा बेरोजगार तरुणांचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.