कवठेमहांकाळ तालुक्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:30+5:302021-01-01T04:18:30+5:30
तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ९८ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी ३०८ अर्ज दाखल झाले आहेत. कोरोनाच्या महामारीचा फिवर ...
तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ९८ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी ३०८ अर्ज दाखल झाले आहेत. कोरोनाच्या महामारीचा फिवर उतरतो तोच, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा फिवर जोरात सुरू झाला आहे. या ग्रामपंचायतींच्या निकालावर पुढील राजकारणाचे वारे वाहणार आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी गावा-गावात आपला गट प्रबळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील इरळी, रायवाडी, जांभुळवाडी, थबडेवाडी, चुडेखिंडी, मैसाळ एम, बनेवाडी, तिसंगी, चोरोची, निमज, नांगोळे, मोघमवाडी आदी गावांची निवडणूक लागली आहे. या प्रत्येक गावात आमदार, खासदार, अजितराव घोरपडे, अनिता सगरे यांचे गट प्रबळ आहेत. गावातील सत्ता खेचण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळीही सक्रिय झाली आहेत.
या ग्रामपंचयतींच्या निवडणुकीनंतर विकास सोसायटी, बाजार समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत सकारात्मक घडामोडींसाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागली आहेत.
तिसंगी, नागोळे, चोरोची ही गावे मोठी असून, या गावांतील सत्ता कुणाकडे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या अकरा गावांपैकी मोघमवाडी, निमज, रायवाडी गावे बिनविरोध करण्यासाठी गावातील राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नागोळे हे गाव संजयकाका पाटील गटाचे प्रमुख नेते कवठेमहांकाळ बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर यांचे आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे तुकाराम हुबाले, सुनील हुबाले यांनी विरोधी पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे या गावाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दादासाहेब कोळेकर हे तालुकास्तरावरील नेते असल्याने त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.