गटारीत पडलेल्या म्हशीला वाचविले, क्रेनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:38 PM2020-06-08T12:38:51+5:302020-06-08T12:40:43+5:30
सांगलीच्या शंभरफुटी रोडवरील मोठ्या गटारीत शनिवारी दुपारी एक गर्भवती म्हैस पडली. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि अॅनिमल राहत संस्थेने धाव घेत अथक् प्रयत्न करून या म्हशीला क्रेनद्वारे बाहेर काढले.
सांगली : सांगलीच्या शंभरफुटी रोडवरील मोठ्या गटारीत शनिवारी दुपारी एक गर्भवती म्हैस पडली. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि अॅनिमल राहत संस्थेने धाव घेत अथक् प्रयत्न करून या म्हशीला क्रेनद्वारे बाहेर काढले.
अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. गटार मोठी असल्याने या म्हशीला वर येणे मुश्किल झाले. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना लगेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली.
त्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे त्यांच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी म्हशीला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण म्हैस गर्भवती असल्याने तिला बांधायचे कसे याबाबत प्रश्न पडला.
अग्निशमन विभागाला अडचणी येत होत्या. त्यांनी अॅनिमल राहतचे सदस्य कौस्तुभ पोळ यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी सर्व रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी बचाव साहित्यासहित दाखल झाली. म्हैस गर्भवती असल्याने तिला कोणतीही इजा न करता क्रेनच्या साहाय्याने अग्निशामक विभाग आणि अॅनिमल राहत यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. याचे नागरिकांनी कौतुक केले.