विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका, ऐतवडे बुद्रुकमध्ये वन विभागाने सात तास राबविली बचाव मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 01:28 PM2023-06-10T13:28:34+5:302023-06-10T13:28:56+5:30
बघ्यांची गर्दी व पोलिसांची दमछाक
ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान दिले. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने पिंजऱ्याद्वारे बिबट्याला बाहेर काढले. हा बिबट्या अंदाजे सहा ते सात महिन्यांचा असावा, अशी माहिती वनविभागाने दिली.
येथील जयसिंगबापू पाटील व आप्पासाहेब पाटील यांच्या विहिरीत गुरुवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला होता. शुक्रवारी सकाळी संबंधित शेतकरी विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी आले असता त्यांना हा बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागास माहिती दिली.
उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी महंतेश बगले, वनक्षेत्रपाल संतोष शिरसेटवार, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, रेडचे वनरक्षक व्ही. व्ही. डुबल व रेस्क्यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेला प्राणी बिबट्याच असल्याची खात्री पटताच त्यांनी तातडीने सापळा व क्रेन मागवली.
सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने बिबट्याजवळ सापळा लावण्यात आला. तो विहिरीतील एका कोपऱ्यात घाबरलेल्या अवस्थेत होता. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेतीन वाजता त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीत बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही सुरू होती.
वन विभागास पोलिस प्रशासन, तलाठी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस पाटील यांचे सहकार्य मिळाले.
बघ्यांची गर्दी व पोलिसांची दमछाक
बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव, जकराईवाडी, चिकुर्डे, देवर्डे, वशी, डोंगरवाडी, शेखरवाडी, कुरळप परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे त्याला पकडण्यात वारंवार अडथळा निर्माण होत होता. भरउन्हात गर्दीला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.