Sangli: समडोळी येथे खणीत मुक्काम ठोकलेल्या अजस्त्र मगरीची सुटका
By संतोष भिसे | Published: April 20, 2024 06:35 PM2024-04-20T18:35:36+5:302024-04-20T18:36:02+5:30
मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले
सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील खाणीतून गावात घुसलेल्या अजस्त्र मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून ती खणीत मुक्कामाला होती.
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ती जनावरांच्या गोठ्याजवळ आली होती. याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागे छप्परवजा गोठ्याबाहेर मगर बराच वेळ पडून होती. सतर्क ग्रामस्थांनी खटपट करुन तिला जेरबंद केले. डोळ्यांवर पोते टाकले. कासऱ्याने बांधले. त्यानंतर वन विभागाच्या ताब्यात दिले.
उप वन संरक्षक नीता कट्टे, सहाय्यक वन संरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी मगरीला रात्रीच ताब्यात घेतले. कुपवाड येथील कार्यालयात आणले. शनिवारी सकाळी तालुका लघु पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. सुमारे चार वर्षे वयाची ही पूर्ण वाढ झालेली मादी होती.
ग्रामस्थांनी सांगितले की, समडोळी गावाजवळील जुन्या खाणीत ती बऱ्याच दिवसांपासून ठिय्या मारुन होती. ग्रामपंचायतीमार्फत खणीत भर टाकून ती भरून घेण्याचे काम सुरु होते. कचरा साफ केला जात होता. यामुळेच मगर खणीबाहेर पडून नागरी वस्तीत आली असावी. मगरीच्या बचाव मोहिमेत उपसरपंच पिंटू मसाले, वन क्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर थोरवत आदी सहभागी झाले.