शिवाजी विद्यापीठात मधुमेहाला प्रतिबंध करणारे संशोधन

By admin | Published: April 17, 2017 07:11 PM2017-04-17T19:11:12+5:302017-04-17T19:11:12+5:30

तंत्रज्ञानाचे लवकर औद्योगिक हस्तांतरण; सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Research on prevention of diabetes in Shivaji University | शिवाजी विद्यापीठात मधुमेहाला प्रतिबंध करणारे संशोधन

शिवाजी विद्यापीठात मधुमेहाला प्रतिबंध करणारे संशोधन

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १७ : शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्या १५ वर्षांच्या अथक संशोधनातून निर्माण करण्यात आलेल्या मधुमेहाला प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाचे लवकरच हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सामंजस्य कराराचा प्राथमिक टप्पा म्हणून ‘लेटर आॅफ इन्टेन्ट’वर (आशय पत्र) सोमवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार धनंजय महाडिक, प्रधान सचिव मीता राजीवलोचन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या.

विद्यापीठातील प्रा. डॉ. अकल्पिता अरविंदेकर या गेल्या १५ वर्षांपासून मधुमेहपूर्व ते मधुमेह होण्याच्या वाटचालीस प्रतिबंध करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत संशोधन करीत आहेत. त्यासाठी त्यांना ३५ लाख रुपयांचा विशेष प्रकल्पही मंजूर झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांचा संघ मधुमेहाला प्रतिबंध करणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत संशोधन करीत आहे.

या संघाने मानवावर घेतलेल्या चाचण्याही कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे हे मधुमेहपूर्व उपचारविषयक तंत्रज्ञान व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने आता औद्योगिक हस्तांतरणास सज्ज आहे. त्या दृष्टीने सोमवारी शिवाजी विद्यापीठास नित्यम दीपकाम प्रायव्हेट लिमिटेडकडून ‘लेटर आॅफ इन्टेन्ट’ प्राप्त झाले आहे. यावर विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कंपनीतर्फे डी. जी. गुणे यांनी स्वाक्षरी केल्या.

दरम्यान, यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रुसा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. खासदार महाडिक यांनी यावेळी केंद्रातील संशोधन सुविधांची फिरून पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. अरविंदेकर यांच्याकडून तेथे सुरू असलेल्या विविध संशोधनाची माहिती घेतली. (प्रतिनिधी) उपयुक्त संशोधन मधुमेहाला प्रतिबंध करणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत १५ वर्षांपासून संशोधन करून औषधांची निर्मिती केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही केलेले हे संशोधन निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रा. अरविंदेकर यांनी व्यक्त केला आहे

शिवाजी विद्यापीठातील रुसा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण खासदार धनंजय महाडिक आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, प्रधान सचिव मीता राजीवलोचन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. जी. एन. शिंदे, डी. जी. गुणे उपस्थित होते.

Web Title: Research on prevention of diabetes in Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.