तामिळनाडूत पालींच्या दोन नव्या प्रजातींचे संशोधन; स्लेंडर गेको कुळातील प्रजातींची संख्या सहावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:53 AM2020-01-31T01:53:40+5:302020-01-31T01:54:57+5:30
हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारतात म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळतात.
- संतोष भिसे
सांगली : तामिळनाडूतील पर्वतरांगांमध्ये पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध संशोधकांनी लावला. संशोधकांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून तामिळनाडूतील पर्वतरांगा पालथ्या घालत आहे. हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारतात म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळतात.
या कुळातील पालींच्या चार प्रजातींची नोंद आजवर झाली आहे, पैकी तीन प्रजातींचा शोध याच पथकाने गेल्यावर्षी लावला होता. पूर्ण अभ्यास व संशोधनाअंती त्याचे निष्कर्ष व शोधप्रबंध ‘झुटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला. या संशोधनामुळे भारतातील या कुळातील पालींच्या प्रजातींची संख्या सहा झाली आहे.
या पाच संशोधकांमध्ये हिवतड (ता. आटपाडी,जि.सांगली) येथील अक्षय खांडेकर, ईशान अगरवाल (ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन मुंबई ), रौनक पाल (बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी), एरन बावर (विलानोवा युनिव्हर्सिटी पेनसिल्व्हानिया ) व अच्युतन श्रीकांतन् (सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस, बंगलोर) यांचा समावेश आहे.
या आहेत नव्या प्रजाती
हेमीफायलोडॅक्टीलस निलगिरीएनसीस (निलगिरी स्लेंडर गेको) : ही प्रजाती तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगेतच सापडत असल्याने तिचे नामकरण या पर्वतरांगेच्या नावावरुन निलगिरीएनसीस असे केले आहे.
हेमीफायलोडॅक्टीलस पेनिंनसुलारीस (केएमटीआर स्लेंडर गेको) : या प्रजातीचा शोध तामिळनाडूमधील कलकड-मुंदांथुराई व्याघ्र प्रकल्पात (केएमटीआर) लावला गेला. ‘पेनिंन’ म्हणजे जवळजवळ आणि ‘सुलारीस’ म्हणजे बेट. अर्थात जवळजवळच्या बेटात आढळणारी पाल.
या दोन्ही प्रजातींचे नमुने आम्हाला सर्वप्रथम २०११ मध्ये मिळाले होते. २०१८ पासून त्यावर संशोधन सुुरू केले. दोहोंचा डीएनए, अंगावरील खवले आणि मांडीवरील ग्रंथींच्या संख्येचा अभ्यास करून त्यांचे वेगळेपण निश्चित केले. हे संशोधन झुटाक्सा या विज्ञानविषयक नियतकालिकाला पाठविल्यानंतर, त्याला मान्यता मिळून प्रसिद्धी देण्यात आली.
- अक्षय खांडेकर, संशोधक, सांगली