आरक्षित जमिनी विकसित कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:34+5:302021-01-10T04:19:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील पूर्वीच्या विकास आराखड्यातील तसेच सध्या नव्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील पूर्वीच्या विकास आराखड्यातील तसेच सध्या नव्याने आखलेल्या आरक्षित जमिनी ताब्यात घेऊन त्या विकसित कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली.
एकनाथ शिंदे हे सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विकास आराखड्यातील सर्व नियोजित रस्ते ताब्यात घेऊन ते विकसित करावेत. महानगरपालिका हद्दीतील पूर्वीच्या आराखड्यातील व सध्या नव्याने आखलेल्या (पाटबंधारे विभागाच्या) पूररेषेची दुरुस्ती होऊन सुधारित आराखडा नकाशामध्ये दर्शवून त्याला मंजुरी द्यावी, पूर्वीच्या आराखड्यातील आरेखनाची चूक दुरुस्त करून मिळावी, विश्रामबाग परिसरात विविध कार्यालये, प्रशासकीय इमारती, खासगी कंपन्यांची कार्यालये तसेच अपार्टमेंट मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये बाहेर गावांहून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी विश्रामबाग परिसरामध्ये मुंबई व ठाण्याप्रमाणे पंचतारांकित स्वच्छतागृहे उभारण्यास निधी मिळावा. महापालिकेच्या बंद असलेल्या शाळा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वस्तिगृहासाठी उपलब्ध व्हाव्यात, महानगरपालिकेने सध्या लागू केलेला उपभोक्ता कर रद्द करावा, सांगलीतील मद्रासी कॉलनी येथे पंचवीस वर्षांपासून राहत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे मिळावीत, आदी मागण्या करण्यात आल्या.