पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे गुऱ्हाळ संपेना

By admin | Published: January 27, 2016 11:12 PM2016-01-27T23:12:35+5:302016-01-28T00:29:03+5:30

राष्ट्रवादी नेत्यांच्या केवळ बैठकाच : जिल्हा परिषदेतील इच्छुक सदस्यांची फरफट

Resignation of the office bearers resigns | पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे गुऱ्हाळ संपेना

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे गुऱ्हाळ संपेना

Next

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींचे बुधवारी राजीनामे मंजूर करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत होते. प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत शिंदे यांच्याकडून निरोपच न आल्यामुळे सर्वच पदाधिकारी शासकीय गाड्या घेऊन गावाकडे रवाना झाले. यामुळे इच्छुक सदस्यांची मात्र निराशा झाली आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील, समाजकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे यांचे राजीनामे घेऊन पंधरा दिवस झाले आहेत. या सर्वांचे राजीनामे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे आहेत. राजीनामे मंजुरीनंतर लगेच नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वी उपाध्यक्ष व चार विषय समिती सभापतींची नावे निश्चित करण्याची गरज आहे. परंतु, पाच पदाधिकाऱ्यांच्या नावावर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नेत्यांचे एकमत होत नाही. राष्ट्रवादीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सदस्यांना पदे देण्यास काही भाजप व शिवसेना नेत्यांचा विरोध आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कुणालाही पदाधिकारी करा, पणे ते राष्ट्रवादीचेच असले पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे. विशेषत: हा वाद खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात टोकाचा चालू आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांचा वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. बुधवारी पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यासाठी बैठक बोलाविली होती. त्यानुसार उपाध्यक्ष पाटील, सभापती कोठावळे, मनीषा पाटील, लांडगे, कचरे उपस्थित होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिंदे राजीनामे मंजूर झाल्याचा कधी आदेश देतात याकडे त्यांचे लक्ष लागून होते. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या दालनात पदाधिकाऱ्यांच्या दोनवेळा बैठका झाल्या. पण, सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुणाचाही निरोप न आल्यामुळे शासकीय गाड्या घेऊन पदाधिकारी पुन्हा गावाकडे रवाना झाले. विलासराव शिंदे यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजुरीचे गुऱ्हाळ महिन्याभरापासून चालू आहे. (प्रतिनिधी)


काँग्रेसबरोबरही चर्चा
राष्ट्रवादीमधील काही नेते भाजप व शिवसेनेमध्ये गेल्यामुळे त्यांचे आणि राष्ट्रवादी नेत्यांचे सूर जुळत नाहीत. राष्ट्रवादीने पदाधिकारी बदलाची शिवसेना व भाजप नेत्यांबरोबरच आता काँग्रेसच्या नेत्यांबरोबरही चर्चा सुरु केल्याची जिल्हा परिषदेत चर्चा चालू आहे. परंतु, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी यापूर्वीच सत्तेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ते राष्ट्रवादी नेत्यांच्या चर्चेला प्रतिसाद देतील का, हे आगामी काळातच निश्चित होणार आहे.

झेडपीची सर्वसाधारण सभा १२ फेब्रुवारीला
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न कधी संपायचा तो संपू दे, असे म्हणत अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सर्वसाधारण सभा दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. अनेक विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सभा आयोजित केली आहे. असे असले तरी सभा घेण्याच्या मुद्द्यावरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


काही सदस्य बंडाच्या पवित्र्यात
जिल्हा परिषद पदाधिकारी बदलामध्ये काही सदस्यांना शिवसेना व भाजपमध्ये असल्याचे कारण पुढे करून त्यांना डावलण्यात येण्याची शक्यता आहे. नेत्यांमध्ये तशी चर्चाही झाल्यामुळे या नाराज सदस्यांनी भाजप व शिवसेना नेत्यांच्या मदतीने निवडीवेळी बंड करण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. या संभाव्य बंडाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धसका घेतल्याची जि. प.मध्ये चर्चा सुरु आहे.

Web Title: Resignation of the office bearers resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.