घरपट्टी सवलतीस सदस्यांचा विरोध

By admin | Published: March 9, 2016 12:55 AM2016-03-09T00:55:34+5:302016-03-09T00:55:34+5:30

आज महासभा : प्रस्ताव बारगळण्याची शक्यता

Resistance to members of the property tax | घरपट्टी सवलतीस सदस्यांचा विरोध

घरपट्टी सवलतीस सदस्यांचा विरोध

Next

सांगली : महापालिका क्षेत्रातील घरपट्टी थकबाकीदारांना शास्तीत ५० टक्के सवलत देण्यास सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी पक्षीय बैठकीत विरोध केला. थकबाकीदारांना सवलत देण्यापेक्षा नियमित कर भरणाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची महासभा बुधवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात घरपट्टीची थकबाकी ३५ कोटींच्या घरात आहे. घरपट्टी न भरणाऱ्यांना महिन्याला दंड लागू केला जातो. या शास्तीची रक्कम पाच कोटींवर गेली आहे. थकबाकीदार शास्तीमुळे घरपट्टी भरत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला आहे. यामुळे थकबाकीदारांना शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली, तर वसुली चांगली होईल, म्हणून सवलतीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत आणला आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कर बुडव्यांना अडीच कोटींची सवलत देऊ नये, अशी मागणी अनेकांनी केली. थकबाकीदारांना सवलत दिली, तर नियमित कर भरणाऱ्यांत वेगळाच संदेश जाईल. त्यात सवलत देण्याचा अधिकार आयुक्तांचा आहे. त्यांनी स्वत: निर्णय घ्यावा. महासभेकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज नाही. भविष्यात विशेष लेखापरीक्षणात आक्षेप आल्यास नगरसेवकांची वसुली लागू शकते, असेही नगरसेवक प्रदीप पाटील, दिलीप पाटील, निर्मला जगदाळे, मृणाल पाटील आदींनी निदर्शनास आणून दिले. करबुडव्यांऐवजी कर भरणाऱ्यांना सवलत दिल्यास थकबाकीचे प्रमाण कमी होईल, असे मतही काही नगरसेवकांनी मांडले.
त्यावर महापौर शिकलगार यांनी, या विषयावर खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे. सभागृहात सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सत्ताधारी गटातूनच सवलत देण्यास विरोधाचा सूर उमटू लागल्याने, सवलतीचा हा विषय बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)


प्रशांत मजलेकर : संचालकपदी शक्य
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून महापालिकेचा प्रतिनिधी पाठविण्याबाबतही पक्षबैठकीत चर्चा झाली. या पदासाठी माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर व माजी स्थायी समिती सभापती संजय मेंढे हे दोघे इच्छुक आहेत. यापैकी मजलेकर हे नगरसेवक व व्यापारी आहेत. त्यांचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांची बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती होऊ शकते. याचा फैसला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व माजी मंत्री आमदार पतंगराव कदम करणार आहेत.

बुधवारी होणाऱ्या महासभेत मैला वाहतुकीच्या दरात वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पूर्वी किलोमीटरला २० रुपये दर होता. आता तो ५० रुपये केला जाणार आहे. जागा भाडेपट्टी, रस्ते खुदाईच्या दरवाढीबाबत सभेत चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिकलगार यांनी सांगितले.

Web Title: Resistance to members of the property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.