कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

By admin | Published: October 3, 2016 12:23 AM2016-10-03T00:23:37+5:302016-10-03T00:23:37+5:30

शांततेच्या वातावरणात ग्रामसभा : काही ठिकाणी सभा तहकूब; विविध ठराव एकमताने मंजूर

Resolution of Maratha Reservation in Kagagaon taluka | कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

Next

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी, मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करावे आणि या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांबाबतचे ठराव सर्वानुमते मंजूर केले.
दरम्यान, कडेपूर, शिरसगावसह काही ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्या. कोरमअभावी तहकूब झालेल्या गावांमध्ये लवकरच पुन्हा ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबतचे ठराव घेणारच आहे, असे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सांगितले.
दि. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गावोगावी ग्रामसभा शांततेच्या वातावरणात झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर, घटनात्मक बदल करून आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील नराधमांना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, शेतीमालाला भाव देण्यासाठी स्वामीनाथन् समितीचा अहवाल स्वीकारावा आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागण्यांचा ठराव अनेक ग्रामसभांमध्ये करण्यात आला.
चिंचणी (अंबक) येथील काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस अनुपस्थित होते. या सदस्यांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. देवराष्ट्रे येथे ग्रामसचिवालय इमारतीमधील दुकानगाळे भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा विषय ऐरणीवर आला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा नियमानुसार निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला.
त्याचबरोबर चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणाचे ठराव केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्रामसभांबाबत अधिकारी अनभिज्ञ
कडेगाव तालुक्यातील किती ग्रामसभा झाल्या आणि किती ग्रामसभा तहकूब झाल्या, याबाबत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास विचारणा केली असता, याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही, असे ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांना किती गावात ग्रामसभा झाल्या, कशा झाल्या, ठराव कोणते झाले याची माहिती नव्हती. दरम्यान, चिंचणी येथील तरूणांनी मराठा आरक्षण ठराव घेण्याबाबतचा निश्चय केला होता. परंतु कोरम पूर्ण होत नव्हता. यावेळी तरूणांनी घरोघरी फिरून ग्रामस्थांना ग्रामसभेत आणले. मग कोरम पूर्ण झाला आणि मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर झाला.
 

Web Title: Resolution of Maratha Reservation in Kagagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.