पाणी टंचाई असणाऱ्या जत गावांत टँकर सुरू करा, विलासराव जगताप : जतमध्ये आढावा बैठक;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:39 PM2018-04-20T23:39:58+5:302018-04-20T23:39:58+5:30
जत : तालुक्यातील एकोणीस गावे आणि त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवत आहे. शासकीय अधिकारी या भागाची पाहणी करून टँकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. परंतु टँकर सुरू करावेत यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. गतवर्षी एप्रिल महिन्यात ८० टँकर सुरू होते, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिल.
जत तालुका पाणी टंचाई आढावा बैठक तहसील कार्यालय परिसरातील तलाठी भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अध्यक्षपदावरून आमदार विलासराव जगताप बोलत होते. तालुक्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. वीज वितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. थकबाकी असलेले वीज कनेक्शन टंचाई कालावधित तोडू नये, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन वीज कनेक्शन बंद केले जात आहे. खराब झालेले विद्युत जनित्र वेळेत बदलून मिळत नाही. त्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे, अशी तक्रार विविध गावांतील सरपंच व उपसरपंच यांनी या बैठकीत केली असता, आमदार विलासराव जगताप यांनी, वीज वितरणचे उपअभियंता संजय काळबांधे यांची कानउघाडणी करून, टंचाई कालावधित आपण कार्यालयात उपस्थित नसता कामासंदर्भात कार्यालयात आलेल्या नागरिकांना समाधानकारक उत्तर देत नाही. तुमच्याविरोधात नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापुढील काळात तुमच्या कामात सुधारणा झाली नाही, तर पाणी टंचाई कामात हयगय केली म्हणून तुमच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी दिला.
तालुक्यातील २९० हातपंप पाणी असूनही केवळ साहित्य नसल्यामुळे बंद आहेत. मागणी करुनही हातपंप दुरुस्त केले जात नाहीत, अशी तक्रार अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी बैठकीत केली असता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता मल्लिकार्जुन मठपती म्हणाले की, सध्या साहित्य आले आहे. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यात येतील.
तालुक्यात मागील दोन वर्षात मनरेगाचे काम सुरू नसल्यामुळे विकास झाला नाही व मजुरांना काम मिळाले नाही. मनरेगा कामात ज्यांनी अपहार केला आहे, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. प्रलंबित सात कोटी पन्नास लाख रुपये संबंधितांना देण्यात यावेत, अशी मागणी लाभार्थी करत आहेत. परंतु या प्रश्नाचे तालुक्यात राजकारण केले जात आहे, अशी खंत आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.
जि. प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मणगौडा रवि-पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, आदींसह ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
सत्ताधारी-विरोधक : आरोप-प्रत्यारोप
कुंभारी गावात पाणी टंचाई जाणवत असून टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी गावातील विरोधी गटाने बैठकीत लावून धरली असता, गावात मुबलक पाणी आहे, टँकरची आवश्यकता नाही, असा दावा सत्ताधारी गटाने केला. पाण्यावरून राजकारण करून आढावा बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असे विलासराव जगताप यांनी सांगून या प्रकरणावर पडदा टाकला.