इस्लामपुरात नगरसेवकांचा सन्मान ठेवा, अन्यथा कारवाई अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:07+5:302021-01-23T04:27:07+5:30

इस्लामपूर : शहरातील सगळेच प्रश्न निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सोडवावे लागत असतील तर तुम्ही काय काम करता? पगार कशासाठी घेता? ...

Respect the corporators in Islampur, otherwise action is inevitable | इस्लामपुरात नगरसेवकांचा सन्मान ठेवा, अन्यथा कारवाई अटळ

इस्लामपुरात नगरसेवकांचा सन्मान ठेवा, अन्यथा कारवाई अटळ

Next

इस्लामपूर : शहरातील सगळेच प्रश्न निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सोडवावे लागत असतील तर तुम्ही काय काम करता? पगार कशासाठी घेता? असे खडे बोल सुनावत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी येत्या २४ तासात आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय झाली पाहिजे, असे निर्देश दिले. सभागृहातील सदस्यांचा सन्मान ठेवावाच लागेल, तुम्हाला जमणार नसेल तर कारवाई अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

येथील पालिकेच्या नाट्यगृहात नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. या सभेपुढे शहराच्या विविध भागातील आरक्षणे उठविण्यासह अनेक विकासकामांना मुदतवाढ, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असे ६८ विषय ठेवण्यात आले आहेत.

सुरुवातीस तत्कालीन मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी तीन कर्मचाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवरून सदस्यांनी आगपाखड केली. सुप्रिया पाटील यांनी ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली.

हे निलंबन कायदेशीर आहे का? ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, ते कायदेशीर वागले का? त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली. विश्वनाथ डांगे, संजय कोरे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत, याकडे लक्ष वेधले. शेवटी मुख्याधिकारी माळी यांनी निलंबन मागे घेतल्याची टिपणी तयार आहे; मात्र त्यावर आदेश दिले गेलेले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.

डॉ. संग्राम पाटील म्हणाले की, शासन निर्णयाच्या माहिती घेण्याच्या विषयावर उपसूचना देत शासन निर्णयासह शासन आणि अधिकाऱ्यांकडून झालेला पत्रव्यवहारही सभागृहासमोर आला पाहिजे.

नगराध्यक्ष पाटील यांनी ही उपसूचना स्वीकारल्याचे सांगत प्रशासनाला योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शहरासाठी थ्री स्टार मानांकन प्राप्त करण्याच्या विषयावर सर्व सदस्यांनी आरोग्य विभागावर हल्लाबोल केला. विक्रम पाटील, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, शकील सय्यद, प्रदीप लोहार, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील अशा सर्वांनी आरोग्य विभागाच्या कामाचे वाभाडे काढले. शेवटी संतप्त झालेल्या नगराध्यक्ष पाटील यांनी कामात सुधारणा न झाल्यास निलंबनाची कारवाई अटळ ठरेल, असा दम भरला.

Web Title: Respect the corporators in Islampur, otherwise action is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.