‘वसंतदादा’च्या जमीन विक्रीला थंडाच प्रतिसाद
By admin | Published: December 5, 2014 10:43 PM2014-12-05T22:43:53+5:302014-12-05T23:27:20+5:30
अधिकाऱ्यांचे मौन : निविदेचे गौडबंगाल काय?
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास तिसऱ्यावेळी मुदतवाढ दिल्यानंतर तिची मुदत शुक्रवारी संपली. यावेळी किती निविदा दाखल झाल्या, याची माहिती अधिकाऱ्यांनी गुप्त ठेवली आहे. यामुळे निविदा प्रकरणाचे गौडबंगाल काय?, असा प्रश्न कारखान्याच्या सभासदांतून उपस्थित होत आहे.
कारखान्याच्या जागा विक्रीसाठी आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निविदा दाखल करण्याची मुदत संपली होती. जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी पुणे येथे असल्यामुळे शनिवारी माहिती देण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीमधील काही अधिकाऱ्यांनी तिसऱ्यावेळीही एकही निविदा दाखल नसल्याचे सांगितले आहे. पुढे कोणता निर्णय घ्यावा, याबद्दल चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे निविदा प्रकरणाचे नक्की काय झाले आहे?, असा प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)