पुण्यात उद्घाटन झाले; मिरजेला कधी येणार हॉटेल चाकावरले?, तीन वर्षांपासून प्रतीक्षा 

By संतोष भिसे | Published: November 29, 2023 05:28 PM2023-11-29T17:28:47+5:302023-11-29T17:29:11+5:30

धावत्या रेल्वेतील प्रवाशांना ऑनलाइन ऑर्डर नोंदवून स्थानकात आल्यावर पार्सल ताब्यात घेता येईल

Restaurant on Wheels didn't open in Mirage Junction even after three years | पुण्यात उद्घाटन झाले; मिरजेला कधी येणार हॉटेल चाकावरले?, तीन वर्षांपासून प्रतीक्षा 

पुण्यात उद्घाटन झाले; मिरजेला कधी येणार हॉटेल चाकावरले?, तीन वर्षांपासून प्रतीक्षा 

संतोष भिसे

सांगली : प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे रेस्टॉरंट ऑन व्हील्स (चाकावरचे हॉटेल) मिरज जंक्शनमध्ये तीन वर्षांनंतरही सुरू झालेले नाही. पुण्यात आठवडाभरापूर्वी उद्घाटन झाले, मिरजेत कधी होणार? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

प्रवाशांना दर्जेदार पदार्थ मिळण्यासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये उपहारगृह सुरू करण्याची कल्पक संकल्पना राबविण्यात येत आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. मिरज जंक्शनबाहेर वाहतूक पोलिस कक्षाशेजारी बोगीसाठी रुळही टाकण्यात आले; पण त्यानंतर काम पुढे सरकले नाही. सध्या तर हा प्रकल्प मिरजेपुरता गुंडाळल्यासारखी स्थिती आहे. या उपहारगृहाचा ठेका सांगलीतील एका व्यावसायिकाने घेतला आहे. मिरजेतील उभारणीवर त्याने काही आक्षेप घेतल्याने काम रेंगाळल्याची चर्चा आहे. नव्या प्रस्तावानुसार उपहारगृहाची जागा थोडीशी बदलण्यात आली आहे; पण काम सुरू होण्याची चिन्हे अद्याप नाहीत.

रेल कोच रेस्टॉरंट या रेल्वेच्या अभिनव उपक्रमाने विविध राज्यांतील प्रवासी आणि लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे ती महाराष्ट्रातही ठिकठिकाणी राबविण्याचे नियोजन आहे. पुणे स्थानकात विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी २२ नोव्हेंबर रोजी उद्घाटन केले. उपहारगृह चालविण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून रेल्वेला वार्षिक ६० लाख रुपये मिळणार आहेत.

असे असेल चाकावरचे हॉटेल

या वातानुकूलित उपहारगृहात २४ तास सेवा मिळेल. किमान १० टेबलांवर ४० लोकांना एकाच वेळी बसता येईल. त्याचा अंतर्भाग कल्पकरीत्या सजविण्यात येतो, त्यामुळे प्रवाशांना जेवणाचा आनंददायी अनुभव मिळतो. पार्सल सुविधाही उपलब्ध असेल. धावत्या रेल्वेतील प्रवाशांना ऑनलाइन ऑर्डर नोंदवून स्थानकात आल्यावर पार्सल ताब्यात घेता येईल. राज कचोरी, छोला भटुरा, पाव भाजी, व्हेज थाली आणि कॉम्बो, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, पॅक स्वीट्स आणि नमकीन, चाट, शीतपेये, सॉफ्टी, पारंपरिक भारतीय मिठाई आदी पदार्थ उपलब्ध असतील.

पुणे विभागातील चिंचवड स्थानकात पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाले आहे. आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांत लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. - डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

Web Title: Restaurant on Wheels didn't open in Mirage Junction even after three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.