टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले; सांगली जिल्ह्यातील २९९ गावांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:53 AM2024-09-16T11:53:38+5:302024-09-16T11:54:00+5:30
सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील; खरेदी-विक्रीस मोकळीक
सांगली : टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २९९ गावांतील शेेतीच्या खरेदी-विक्रीस मोकळीक मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील आहेत.
टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना राबविताना शासनाने हजारो एकर जमिनींचे संपादन केले होते. या जमिनींवर योजना पूर्ण झाल्या, तरी मोठ्या प्रमाणात जमिनी शिल्लक होत्या. योजनांसाठी जमिनी लागतील म्हणून शासनाने लाभक्षेत्रातील २९९ गावांतील शेतजमिनींवर स्लॅब लागू केला होता. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कांमध्ये पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा नोंदविला होता. त्यामुळे या जमिनींचे खरेदी विक्री, हस्तांतरण किंवा गहाणवट यावर निर्बंध लागू होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती. हा स्लॅब उठविण्याची मागणी शेतकऱ्यांतून सातत्याने होत होती.
सिंचन योजना बहुतांश पूर्ण झाल्याने निर्बंधांची गरज नसल्याचे प्रशासनाचे मत होते. निर्बंध हटवावेत, असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी मे २०२२ मध्ये शासनाला पाठविला होता. त्याला गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे या जमिनी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुक्त झाल्या आहेत. सातबारा उताऱ्यांवरील शेरे कमी होणार आहेत.
तालुकानिहाय गावे अशी
खानापूर - ९६, पलूस - १, कडेगाव - ३०, तासगाव - ४३, कवठेमहांकाळ - ४७, मिरज - ४६, आटपाडी - ३६