प्रभाग समितीची पुनर्रचना नागरिकांच्या गैरसोयीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:12+5:302021-04-01T04:28:12+5:30
सिंहासने म्हणाले, महापालिकेत २०१८ ला भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग समित्यांची रचना झाली होती. त्यावेळी नागरिकांच्या सोयीनुसार चार प्रभाग तयार ...
सिंहासने म्हणाले, महापालिकेत २०१८ ला भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग समित्यांची रचना झाली होती. त्यावेळी नागरिकांच्या सोयीनुसार चार प्रभाग तयार केले होते. मात्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रभाग समित्यांची सभापतीपदे मिळविण्यासाठी पुनर्रचनेचा ठराव केला. पूर्वी ठराव रद्द न करता नव्याने प्रभागाची पुनर्रचना करणे चुकीचे आहे. त्यात अर्थसंकल्पीय सभेत इतिवृत्त मंजूर करता येत नसतानाही, त्याला मान्यता देण्यात आली. हे महापालिकेच्या अधिनियमाविरोधात आहे. शिवाय प्रभाग रचना करताना प्रभाग संलग्नतेचा भंग झाल्याची चर्चा सुरू आहे. विश्रामबाग येथील प्रभाग क्रमांक १९ हा कुपवाडला जोडला गेला आहे. तसेच गावभाग येथील प्रभाग क्रमांक १४ हा प्रभाग दोनला, तर मिरज येथील प्रभाग क्रमांक तीन हा कुपवाडला जोडला आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. आयुक्तांनी याला मान्यता देऊ नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सिंहासने यांनी दिला.
चौकट
कारवाईची नोटीस आल्यानंतर बघू...
ऑनलाईन महासभेत गोंधळ घातल्याप्रकरणी संबंधित भाजपच्या नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत विनायक सिंहासने यांना विचारले असता, महापौरांनी कारवाईबाबत काय मागणी केली आहे, याची आम्हाला माहिती नाही. ज्यावेळी आयुक्तांकडून आम्हाला नोटीस येईल, त्यावेळी पाहू, असे त्यांनी स्पष्ट केले.