दुष्काळग्रस्तांचं जीणं ‘फेसाटी’त मांडलं: नवनाथ गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:17 AM2018-07-04T00:17:55+5:302018-07-04T00:18:01+5:30
बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.
येथील राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारतीच्या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे या दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. गोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, जि. प. सदस्य सरदार पाटील, रा. स. प. अध्यक्ष अजित पाटील, मराठी-कन्नड साहित्य परिषदेचे डॉ. रवींद्र आरळी, डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित होते.
मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की, शाळेमध्ये शिकवत असताना लहान मुलांसमोर आदर्श उभे करण्यासाठी मी लिहित गेलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी यशाचे शिखर गाठले, त्यांच्यावर लिहित गेलो आणि त्यातीलच एक कथा आठवीच्या बाल भारती या पुस्तकात समाविष्ट झाली. त्यामुळे लिखाणाची प्रेरणा वाढली.
प्राचार्य डॉ. ढेकळे यांच्याहस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारती या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सत्कार केला.
यावेळी डॉ. श्रीकांत कोकरे यांनी गोरे व ऐनापुरे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनाचा धगधगता प्रवास प्रेक्षकांसमोर उभा केला. मराठी विभागप्रमुख प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कुमार इंगळे यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. सागर सन्नके यांनी आभार मानले.
जत तालुक्याच्या वैभवात भर
डॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले की, जीवनामध्ये अनेक संकटे येतात. त्या संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य पुस्तकामध्ये असते. विचारांची एकरूपता आणि सामाजिक संवेदनशीलता एकत्र आले की नवीन साहित्य जन्माला येते. ‘फेसाटी’ कादंबरीस साहित्य अकादमीसारखा मोठा पुरस्कार प्राप्त झाला, ही जतच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे.