सांगली दूध उत्पादकांना दहा कोटींचा फटका चार दिवसांच्या आंदोलनाचा परिणाम : ४० लाखाचे दूध संकलन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:51 AM2018-07-21T00:51:50+5:302018-07-21T00:52:11+5:30
सांगली : गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सोमवारी दि. १६ रोजी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी चौथ्या दिवशी सायंकाळी संपले. या कालावधित जिल्ह्यातील ४० लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाल्यामुळे दूध उत्पादकांना सुमारे १० कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. आंदोलनातील हे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांनी आनंदाने सहन केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांचे एकूण १४ लाख ५० हजार लिटर दूध संकलन होत आहे. त्यापैकी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी १३ लाख ५० हजार लिटर, दुसºया दिवशी ११ लाख, तिसºया दिवशी ९ लाख आणि चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रातील सहा लाख ५० हजार लिटर दुधाचे संकलन झाले नाही. सायंकाळी आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर दूध संघ, दूध संकलन केंद्र चालकांनी दूध संकलनास सुरुवात केली.
चार दिवसांचे मिळून जवळपास ३८ लाख लिटर दुधाचे चार दिवसात संकलन झाले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्त सहभागी झाले होते. अनेक शेतकºयांनी दूध संघाला दूध घालण्याऐवजी मोफत त्याचे वाटप केले. काहींनी द्राक्षबागांवर फवारले, तर काहींनी ठिबकद्वारे दूध द्राक्षबागांना घातले. दुधाची विक्री न झाल्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकºयांना चार दिवसात सुमारे दहा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान शेतकºयांनी आनंदाने सहन केले आहे. कारण, पाण्यापेक्षाही कमी दराने म्हणजे १७ ते १९ रुपये प्रति लिटर दराने गाईचे दूध खरेदी केले जात होते.
महिन्याला दूध उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत होते. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकºयांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळाले आहे. यामुळे दूध संघ आणि दूध संकलन केंद्र चालकांवर प्रति लिटर २५ रुपये लिटरने गाईचे दूध खरेदीची सक्ती केल्याचा दूध उत्पादकांना निश्चित फायदा होणार आहे.