सहकार विभागाचा निकाल गुलदस्त्यात
By admin | Published: December 27, 2015 11:51 PM2015-12-27T23:51:55+5:302015-12-28T00:33:57+5:30
वसंतदादा बॅँक : युक्तिवाद अंतिम टप्प्यात आला तरी निर्णय नाही
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी युक्तिवादाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तरीही बॅँकेच्या दोन माजी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर सहकार विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. यातील सर्वांनी म्हणणे सादर केल्याने प्रत्यक्षात युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. युक्तिवादाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. माजी संचालक व कर्मचाऱ्यांपैकी १९ जणांचा युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यांना ३० डिसेंबर रोजी युक्तिवादासाठी संधी देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असतानाच, सहकार विभागाच्या निकालाअभावी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
घोटाळ्याप्रकरणी दोन तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार विभागाकडे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या निर्णयांविरोधात अपील केले होते. कागदपत्रांच्या प्रती विकत देण्याच्या मुद्द्यावर हे अपील होते. त्यामुळे सहकार विभागाने याप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांपुरती चौकशीला तात्पुरती स्थगिती देऊन नंतर त्यावर सुनावणी घेतली.
सुनावणीला चौकशी अधिकाऱ्यांनीही म्हणणे सादर केले. त्यानंतर सहकार विभागाचा निकाल लगेच अपेक्षित होता. आता सुनावणी होऊनही महिना होत आला तरीही सहकार विभागाने याविषयीचा निर्णय अद्याप कळविलेला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या बॅँकेच्या चौकशीला अडथळा येऊ शकतो. (प्रतिनिधी)
चौकशीच्या घडामोडी
बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक व ७३ कर्मचाऱ्यांना नोटिसा
सर्वांनी म्हणणे सादर केल्याने युक्तिवादाला सुरूवात
युक्तिवादाचे काम अंतिम टप्प्यात
माजी संचालक व कर्मचाऱ्यांपैकी १९ जणांचा युक्तिवाद अपूर्ण
दोन अधिकाऱ्यांच्या अपिलावर निर्णय नसल्याने संभ्रम