रेठरेधरणचा ‘मांझी’ स्वत:च खणतोय विहीर...

By admin | Published: May 29, 2016 11:00 PM2016-05-29T23:00:37+5:302016-05-30T00:51:35+5:30

शेतकऱ्याची जिद्द : ऐन उन्हाळ्यात धडपड; पहार, घणाचे घाव घालून दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न

Rethadharan's 'Manjhi' is excavating its own well ... | रेठरेधरणचा ‘मांझी’ स्वत:च खणतोय विहीर...

रेठरेधरणचा ‘मांझी’ स्वत:च खणतोय विहीर...

Next

मानाजी धुमाळ -- रेठरेधरण --धरणीमातेच्या पोटातील पाणी शोधण्यासाठी काळ्याकुट्ट दगडावर पहार व घणाचे घाव घालत विहीर खणण्याचा निर्धार रेठरेधरण (ता. वाळवा) येथील शेतकरी शहाजी कांबळे यांनी केला आहे. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शहाजी परशुराम कांबळे (वय ६२) यांची पूर्वीपासून शेती आहे. कांबळे यांना शेतातील कष्टाची, कामाची सवयच आहे. रेठरेधरण परिसरातील विहिरी काढून देण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केले आहे. रेठरेधरण-पेठ रस्त्यालगत तांबड्या मुरमाड मातीची त्यांची अडीच एकर शेती आहे. त्या जागेत दोन वर्षांपूर्वी त्यांनी विहिरीसाठी खड्डा खणला होता. परंतु शेतातून उत्पन्नच हातात येत नसल्याने विहीर काढण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले होते.
शेतातील गवत-पाल्याच्या झोपडीत ते विसावलेले असतात. यंदा पाऊसमान कमी झाल्याने शेतात काहीच काम नव्हते म्हणून त्यांनी एप्रिल महिन्यात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून पहारेच्या साहाय्याने दगड फोडण्यास सुरुवात केली. मोठ्या दगडावर हातोड्याने प्रहार करुन तो फोडायचा आणि डोक्यावरून वाहून तो विहिरीच्या बाजूला लावायचा, असा नित्यक्रम महिनाभर सुरू होता.
अंगात धमक, मनगटात विश्वास व घाम गाळण्याची तयारी असेल, तर कामाच्या एकाग्रतेने अशक्य ते काम शक्य होते, हे त्यांच्या कामातून दिसून आले आहे.
काळ्या दगडाचे कप्पे फोडण्यासाठी कांबळे यांनी चार दिवस सुरुंग व यारी लावून दगडांना छेद दिला. परंतु दररोज राबून विहिरीतून पाण्याच्या उमाळ्याचा त्यांचा शोध सुरु आहे. शहाजी कांबळे यांनी एकट्याने दिवस दिवसभर मेहनत करून विहिरीतील दगड फोडून ते बाहेर काढून विहिरीच्या भोवताली रचले आहेत. कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी छोटे-मोठे दगड गोलाकार पध्दतीने व्यवस्थित रचलेले आहेत. त्यांचे हे काम पाहून परिसरातील लोकांसह अनेकजण अचंबित झाले आहेत.
अजून पावसाला सुरुवात झाली नसल्याने दिनक्रमात बदल न करता, न थकता, न दमता कांबळे विहीर खोदण्याच्या कामात व्यस्त आहेत. १० ते १५ दिवसांमध्ये विहिरीच्या दगडी कामाच्या बाजूला ते भराव टाकून घेणार आहेत. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले असून, पाण्याचा अजून मागमूस नाही.
निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट ओढावले आहे. विहिरीत पाणी नाही, पाण्याविना पीक नाही. त्यामुळे हाती पैसा नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. अशा अवस्थेत शहाजी कांबळे यांनी विहीर खुदाईचे सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे.

१७ फुटांपर्यंत काम...
विहीर खुदाईचे काम १७ फूट झाले आहे. या विहिरीतून ४० ट्रॉली दगड, कचरा, माती विहिरीच्या कडेला रचण्यात आली आहे. विहिरीतील दगड पहारेच्या साहाय्याने निघत नसल्याने नाईलाजास्तव कांबळे यांनी सुरुंग लावून चार दिवस यारीच्या साहाय्याने माती व दगड बाहेर काढले.

Web Title: Rethadharan's 'Manjhi' is excavating its own well ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.