वाळवा तालुका भाजप अध्यक्षपदी रेठरे हरणाक्षचे धैर्यशील मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:26 AM2021-03-25T04:26:06+5:302021-03-25T04:26:06+5:30
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या वाळवा तालुका व इस्लामपूर शहर भाजप अध्यक्षनिवडी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ...
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या वाळवा तालुका व इस्लामपूर शहर भाजप अध्यक्षनिवडी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जाहीर केल्या. वाळवा तालुका अध्यक्षपदी रेठरे हरणाक्षचे धैर्यशील शिवाजीराव मोरे यांची, तर इस्लामपूर शहर अध्यक्षपदी अशोकराव यशवंत खोत यांची निवड करण्यात आली. हे दोघेही नगराध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचे समर्थक आहेत.
माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते मोरे व खोत यांना निवडीचे पत्र देण्यात आले. साळुंखे म्हणाले, भाजप पक्ष हा दूरदृष्टी, विचार व कर्तबगारी असणाऱ्यांचा आहे. वाळवा तालुक्यात अनेक वर्षे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागला; पण अपुऱ्या कार्यकर्त्यांमुळे यशापर्यंत पोहोचता येत नव्हते; पण अलीकडील तीन-चार वर्षांत निशिकांत भोसले-पाटील यांनी भाजपची खरी ओळख निर्माण करण्याचे काम केले. पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. विरोधकांना जमिनीवर आणण्याचे व भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे काम खऱ्या अर्थाने पाटील यांच्या अथक परिश्रमातून झाले आहे.
यावेळी नूतन अध्यक्ष मोरे व खोत म्हणाले, भाजप पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला अनेक अडचणी येत असतानाही एक-एक कार्यकर्ता संघटित करीत गेलो. भाजप पक्षाचे विचार व काम घराघरांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, विकास पाटील, दादासाहेब रसाळ, संजय हवालदार, संजय जाधव, प्रांजली अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष संदीप सावंत, चंद्रकांत पाटील, अरुण शिंगण, प्रवीण माने, गजानन पाटील, प्रवीण परीट, ॲड. वर्षा मठकरी, पोपट शिंदे, मनोज मगदूम, अक्षय कोळेकर उपस्थित होते.
फोटो : २४ इस्लामपूर १
ओळ : इस्लामपूर येथे भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांना माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी निशिकांत पाटील, अशोक खोत, संजय हवालदार, चंद्रकांत पाटील, प्रवीण माने उपस्थित होते.