रेठरेधरणच्या सचिनने ‘आयुष’ला दिले ‘आयुष्य’
By Admin | Published: November 19, 2015 11:39 PM2015-11-19T23:39:06+5:302015-11-20T00:19:23+5:30
रात्रीची घटना : आडात पडूनही जीवदान
मानाजी धुमाळ --रेठरेधरण (ता. वाळवा) येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे असणाऱ्या गोरक्षनाथ आडामध्ये रात्रीच्या वेळेस खेळताना पडलेल्या आयुष कैलास शेटे (वय ५ वर्षे) या लहान मुलास क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा जीव धोक्यात घालून आडामध्ये उडी मारून सचिन शिवाजी पाटील या युवकाने वाचविले. रात्रीच्यावेळी आडात पडूनही वाचलेल्या आयुषला त्याच्यामुळे नवीन आयुष्य लाभले.
‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या उक्तीची आठवण करून देणारा हा प्रसंग उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. रात्री ८ च्या सुमारास अंधारामुळे आयुष कैलास शेटे हा ५ वर्षाचा मुलगा पाण्यात पडला. तो दिसेनासा झाल्याने मुलाचे आजोबा व समाधान हेअर सलूनमध्ये आलेले सचिन पाटील हे मुलास शोधू लागले. मुलगा आडात पडला असावा, अशी शंका सचिन पाटीलला आली. त्याने मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने आडात पाहिले असता, पाणी हलत असल्याचे दिसले. मुलगा पाण्यात पडून तीन ते चार मिनिटे झाली होती. आडात पाच ते सहा फूट पाणी व मोटारी होत्या. दगडी बांधकामाचा अरुंद आड होता. पण जिवाची तमा न बाळगता सचिन पाटीलने आडात उडी मारून बालकास वर काढले. सचिनने प्रसंगावधान राखून बालकाच्या पोटावर दाब देऊन पोटातील पाणी काढले. नंतर दोरीच्या साहाय्याने सचिन पाटील व त्या बालकास सुखरूप बाहेर काढले. (वार्ताहर)
अनेक दुर्घटना
हा आड रस्त्यापासून उंचीवर असल्याने नवख्या लोकांना याचा अंदाज येत नाही. यापूर्वीही या आडात एक व्यक्ती व गाय पडून जखमी झाली होती. गाईला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या आडास ग्रामपंचायतीने संरक्षक कठडा बांधून घ्यावा, अशी मागणी होत आहे.